कर्जबाजारीपणा,पिक नुकसान आणि नैराश्याचा कडवा शेवट, धोत्रा येथील तरुण शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील धोत्रा गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, सततच्या पिकनुकसानीने आणि वाढत्या कर्जाच्या ताणाने त्रस्त होत अल्प भूधारक तरुण शेतकरी संतोष (बापू )शाहूराव दोडके वय 36 यांनी अखेर जीव देण्याचा मार्ग स्वीकारला.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेचे तीव्र चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून हवामानातील अनिश्चितता अतिवृष्टी व पावसाच्या असमान पर्जन्यामुळे माफक पिक येणे ही संतोष दोडके यांच्या शेताची कायमस्वरूपी समस्या बनली होती. यामुळे शेतीवरील खर्च तर वाढतच होता,उलट उत्पन्न मात्र कमी होत गेल्याने त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे ढासळले होते.
यामध्येच महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेतलेले कर्ज कशाने फेडावे, घरखर्च कसा भागवावा, पुढील हंगामासाठी तयारी कशी करावी याबाबतच्या चिंता वाढतच चालल्या होत्या.या सलगतणावातून आणि विवंचनेतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न सापडल्याने संतोष दोडके यांनी दिनांक 27 रोजी गुरुवारी विषारी औषध प्राशन केल्याची घटना उघडकीस आली. कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने बीड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती सतत खालावत गेली आणि अखेर दिनांक 29 नोव्हेंबर रोजी शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संतोष दोडके हे प्रेमळ मनमिळावू शांत स्वभावाचे होते.त्यांच्या निधनामुळे धोत्रा गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुली असा परिवार असून,कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.गावातील शेतकरी बांधवांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली असून,शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी केली आहे.या घटनेने पुन्हा एकदा शेती व्यवसायातील अस्थिरता, कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणाव या गंभीर मुद्द्यांना अधोरेखित केले आहे.



