रस्ता अपघातातील तरुणाचा प्राण वाचविण्यासाठी धडपड केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे सन्मानित,अपघातग्रस्त तरुणास जीवदान देणाऱ्या ढाकणे दाम्पत्याचा लोकशाही पत्रकार संघाकडून सन्मान

केज/प्रतिनिधी
मौजे जोला ता.केज येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई बाजीराव ढाकणे व सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी गुरूवार दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी केज – बीड रोडवरील आंबाळाच्या बरडाच्या पुर्वेस असलेल्या पुला जवळ रस्त्यालगतच्या खड्ड्यांमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अपघातग्रस्त तरुणास वेळेत मदत करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला.अपघात ग्रस्त धिरज भानुदास भवर मु.आष्टा हरीनारायण,ता.आष्टी या तरुणास त्यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून बीड येथील जिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.अपघातानंतर जखमी तरुण गंभीर अवस्थेत असल्याचे लक्षात येताच ढाकणे दाम्पत्याने क्षणाचाही विलंब न करता १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला.वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे जखमीवर तातडीचे उपचार सुरू होऊ शकले आणि त्याचा जीव वाचण्यास मदत झाली.
संकटाच्या वेळी धावून जाऊन केलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.या सन्मान सोहळ्याला बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उप निरीक्षक विजय जाधवर,वाचनालयसंघाचे डॉ.राजेंद्र सानप,बीड नगरपालिकेचे नगरसेवक अॕड.गोविंद शिराळे, लोकशाही पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.सुनंदा केदार,बीड शहर वाहतूक शाखेचे मुंडे साहेब,शिंदे साहेब,गाडे साहेब,शेख मॅडम, लोकशाही पत्रकार संघाचे अध्यक्ष भागवत वैद्य, मराठवाडा कार्याध्यक्ष आत्माराम वाव्हळ,पाटील साहेब,बीड जिल्हासंघटक तथा पत्रकार संजय देवा कुलकर्णी कुक्कडगाव कर,प्रकाश गाडे,पत्रकार किशोर देवा कुलकर्णी यांच्यासह लोकशाही पत्रकार संघाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी ढाकणे दाम्पत्याच्या कार्याचे विशेष कौतुक करत,अपघात स्थळी मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा आहे. अशा माणुसकीच्या कृती मुळे समाजातसकारात्मक संदेश पोहोचतो, असे मत व्यक्त केले.तसेच नागरिकांनी अपघात पाहिल्यास भीती न बाळगता जखमींना तातडीने मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले.सत्कार स्वीकारताना ढाकणे दाम्पत्याने, अपघातातील जखमीला वेळेत मदत मिळणे अत्यंत गरजेचे असते.प्रत्येक नागरिकाने माणुसकीच्या नात्याने पुढे येणे आवश्यक आहे अशी भावना व्यक्त केली.



