
केज /प्रतिनिधी
ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज अधिक पारदर्शक आणि वादमुक्त करण्यासाठी पंचायत समिती केज यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.ग्रामपंचायत जिवाचीवाडी ता.केज जि. बीड येथे गटविकास अधिकारी यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन तिचे व्हिडिओ चित्रिकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या ग्रामसभेत विहिरीसाठी लाभार्थी निवड तसेच पंधरावा वित्त आयोग अंतर्गत खर्च मंजुरीचा विषय हाताळला जाणार आहे.पंचायत समिती कार्यालयाकडून सरपंच व ग्रामसेवक यांना पाठविण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार, संबंधित विषयावर आलेल्या अर्ज आणि वरिष्ठ स्तरावरील पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात येत आहे. अर्जदार श्री.सुभाष सखाराम सारुक मु.पो. जिवाचीवाडी, ता.केज यांनी केलेल्या मागणी वरून हा विषय पुढे आला असल्याचे पत्रात नमूद आहे.
काय आहेत प्रमुख सूचना?
ग्रामसभा गटविकास अधिकारी (BDO) यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात यावी.संपूर्ण ग्राम सभेचे व्हिडिओ चित्रीकरण करणे आवश्यक राहील.
विहिरीसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतच करावी.
पंधरावा वित्त आयोग निधीतून होणाऱ्या खर्चास ग्रामसभेत मंजुरी घ्यावी.
ग्रामसभेनंतर झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पंचायत समिती कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील.
पारदर्शकतेवर भर.
ग्रामपातळीवरील निधी वाटप व लाभार्थी निवड प्रक्रियेत अनेकदा तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमी वर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.व्हिडिओ चित्रिकरणामुळे भविष्या तील वाद टाळण्यास मदत होणार असून निर्णय प्रक्रियेची पारदर्शकता वाढणार आहे.
प्रशासनाचा स्पष्ट संदेश
पंचायत समिती केज यांनी ग्रामपंचायतींना स्पष्ट शब्दांत सूचित केले आहे की,नियमांचे पालन करूनच कार्यवाही करावी आणि त्याचा लेखी व दृश्य पुरावा कार्यालयात सादर करावा.यामुळे गाव पातळीवरील विकासकामे आणि निधी वापरावर अधिक देखरेख राहणार आहे.या निर्णयामुळे जिवाचीवाडी ग्राम पंचायतीतील पुढील ग्रामसभा आता प्रशासनाच्या देखरेखी खाली आणि नोंदणीकृत पद्धतीने पार पडणार असल्याने गावकऱ्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.दरम्यान प्रसार माध्यमांनी ही या संदर्भात बातम्या प्रकाशित केल्या होत्या.



