तलाठ्याच्या आत्महत्ये प्रकरणी पत्नीविरुद्ध अंबाजोगाईत गुन्हा दाखल,लग्नानंतर अवघ्या बारा दिवसात संपवली होती जीवन यात्रा

अंबाजोगाई/प्रतिनिधी
लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच, पत्नीच्या असलेल्या प्रेम संबंधांमुळे आणि जाचाला कंटाळून गणेश दत्तू कोळी वय २६ वर्ष या तलाठी तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात समोर आली होती.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मृत तरुणाची पत्नी दिपाली हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी रा.नांदूर्गा,ता. औसा,जि. लातूर यांनी या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत नमूद केल्या नुसार,त्यांचा मुलगा गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता.त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती.मार्च २०२६ मध्ये त्याचा विवाह बीड येथील दीपाली धनंजय कोळी हिच्याशी निश्चित झाला आणि १३ मे रोजी त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. दीपाली ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कार्यरत आहे.
लग्नानंतर कुल दैवताच्या दर्शनाला गेले असताना दीपालीचे वागणे संशयास्पद वाटू लागले.ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असे.त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली,मात्र दिपालीचे वागणे बदलले होते.तिने हे लग्न आपल्या मर्जी विरुद्ध झाल्याचे सांगत गणेश सोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली. गणेश २४ मे रोजी दिपालीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला.२५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की,दिपालीचे दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे,जे त्याने वाचले आहे.यावरून त्यांच्यात वाद झाला होता.त्यानंतर काही वेळातच गणेशने दिपाली राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली.
दिपालीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासा मुळेच गणेशने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून,पोलीस निरीक्षक वशिष्ठ कांगणे पुढील तपास करत आहेत.दरम्यान या घटने नंतर उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.



