
बीड/प्रतिनिधी
ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून,कामगारांच्या सुविधेसाठी तातडीने नवीन कार्यपद्धती (एसओपी)तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातूनओळखपत्रांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय स्थलांतर पूर्व नियोजन समन्वय बैठकीत ते अध्यक्षस्थाना वरून बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीनरहमान, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त भोगले, जिल्हा आरोग्यअधिकारी गंडाळ,शिक्षणाधिकारी, महिला व बालविकास अधिकारी,सहाय्यक कामगार आयुक्त, ऊसतोड कामगार कृती समितीचे बाजीराव ढाकणे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ऊसतोड कामगारांचे स्थलांतर, आरोग्य,शिक्षण, पोषण, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि सामाजिक सुरक्षा या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगारांचा डेटा ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात ते स्थलांतरित होतात,त्या प्रशासनाशी सामायिक करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे स्थलांतरित कामगारांना तेथील शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आरोग्य सेवांसाठी विशेष उपक्रम
ऊसतोड कामगारांच्या कामाच्या वेळा लक्षात घेऊन सकाळी लवकर अथवा सायंकाळी आरोग्यशिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.या शिबिरांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.तसेच स्थलांतरित महिलांमधून आरोग्य सखी ची निवड करून त्यांना प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्याची योजना देखील बैठकीत मांडण्यात आली.
शिक्षण व बालहक्कांवर भर
ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी मंजूर झालेल्या सर्व संत भगवान बाबा बालिका आश्रम शाळा आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले.याशिवाय ज्या मुलांकडे जन्म नोंदणी दाखले उपलब्ध नाहीत,त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवून जन्मदाखले उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेल्पलाइनची प्रभावी अंमलबजावणी
ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १८००२३३१२१२ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध योजनांची गावागावांत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाला देण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा संपर्क अधिकारी एच.पी. देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एमआयएस अधिकारी अनुप मोरे यांनी ऊसतोड कामगारांसमोरील समस्या,आव्हाने आणि संभाव्य उपाययोजनांवर सविस्तर सादरीकरण केले. तर अश्वजीत जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी बाजीराव ढाकणे,विशाल झीन्जूर्डे, राहुल घनघाव, ओमप्रकाश गिरी,मनीषा तोकले आदींनी ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या.प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम करून ऊसतोड कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बैठकीच्या शेवटी केले.



