मयत भावाला कागदावर जिवंत करून जमीन, बोअरवेल हडपले, पुतण्या मुंद्राक विक्रेता, नोटरी वकिल,तलाठी, मंडळ अधिकाऱ्यासह ७ जणांविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

धारूर/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात महसुल विभागात भ्रष्टाचाराचा कळस करणारी घटना समोर आली आहे.मयत व्यक्तीला कागदोपत्री जिवंत दाखवून बोगस दस्तऐवज तयार करून वडिलोपार्जित जमीन व बोअरवेल हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मयताच्या सख्ख्याभावाने शुक्रवारी दि.५ मे रोजी धारूर पोलीस ठाण्यात पुतण्या, नोटरी वकील,मुद्रांक विक्रेता, तत्कालीनतलाठी व मंडळ अधिकाऱ्यासह ७ जणां विरुद्ध लेखी तक्रार दाखल करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,वाघोली ता. धारूर येथील रहिवासी कै.आबासाहेब बाबुराव गव्हाणे यांचे दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाले.त्यांच्या मृत्यूनंतर सह दिवाणी न्यायाधीश,धारूर यांच्या न्यायालयाने दि.१४ डिसेंबर २०२१ रोजी वारसा प्रमाणपत्र निर्गमित करून त्यांचे कायदेशीर वारस म्हणून मुले अशोक,गोकुळ व नितीन यांची नोंद केली. मात्र,वाघोलीयेथील सर्व्हे नं. २४६ मधील ६१ गुंठे वडिलोपार्जित जमीन ही कै.आबासाहेब व त्यांचे भाऊ मधुकर बाबुराव गव्हाणे यांच्या सामायिक मालकीची असून त्यात सामायिक बोअरवेल आहे.या जमिनीची अद्याप कायदेशीर वाटणी झालेली नाही.
मयताला जिवंत करून घोटाळा कसा केला?
तक्रारदार मधुकर गव्हाणे यांच्या आरोपा नुसार,आरोपी पुतण्या अशोक आबासाहेब गव्हाणे याने चुलत्याचा हिस्सा हडपण्यासाठी संगनमताने कट रचला.
दि.१० जुलै २०२४ रोजी मयत आबासाहेब गव्हाणे यांच्या नावाने हस्ते खुद्द असे लिहून मुद्रांक विक्रेते आर.एन. मोरे यांच्याकडून १०० रुपयाचा बॉण्ड खरेदी केला.त्यावर मयत व्यक्तीची इंग्रजी स्वाक्षरी दाखवली.त्याच दिवशी नोटरी ॲड.मंगल एच. नेहरकर यांनी कोणतीही शहानिशा न करता मयत व्यक्तीच्या नावाने बोअरवेल नोंदीसाठी शपथपत्र नोटरी केले. त्यावर मयताची मराठीत साधी स्वाक्षरी आहे.
तत्कालीन तलाठी शरद जानकीराम राठोड यांनी दि.१८ जुलै २०२४ रोजी मयत व्यक्तीच्या नावाचा अर्ज स्वीकारला.अर्जावर इंग्रजीत किचकटस्वाक्षरी असून वर दि.१७ जुलै २०२४ व खाली दि. १८ जुलै २०२६ अशा विसंगत तारखा आहेत.
तत्कालीन मंडळ अधिकारी लहू भीमराव केदार यांनी दि.२७ आॕगष्ट २०२४ रोजी कोणतीही शहानिशा न करता फेरफार क्र.१०८२ मंजूर केला.यामुळे फिर्यादी मधुकर गव्हाणे यांचा बोअरवेल मधील कायदेशीर हिस्सा संपुष्टात आला.
सात जणांवर अजामीन पात्र गुन्हे दाखल होणार ?
- अशोक आबासाहेब गव्हाणे,पुतण्या
- ॲड.मंगल एच. नेहरकर,नोटरी
- आर.एन.मोरे,मुद्रांक विक्रेता
- शरद जानकीराम राठोड,तत्कालीन तलाठी
- लहू भीमराव केदार, तत्कालीन मंडळ अधिकारी
- धर्मराज अप्पाराव कुटूळे,(साक्षीदार )
- अशोक संदिपान शिंदे, (साक्षीदार )
या सातजणां विरुद्ध तक्रारदार मधुकर गव्हाणे यांनी दि.५ जुन २०२६ रोजी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ [फसवणूक],३३६ [बनावट दस्त तयार करणे],३३७ [बनावटदस्त वापरणे],३३८[महत्वाच्या दस्ताची बनावट], ६१ [गुन्हेगारी कट], ३(५) [सामाईक हेतू] अन्वये अजामीनपात्र गुन्हा नोंदवुन कायदेशीर कारवाई करावी असी लेखी मागणी केली आहे.
मरणोत्तर विटंबना तक्रारदाराचा आरोप
माझ्या भावाचा मृत्यू २०२१ ला झाला.कोर्टाने वारसा प्रमाणपत्र दिले. तरीही माझ्या पुतण्याने नोटरी,तलाठी,मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून माझ्या भावाला कागदावर जिवंत केले. माझ्या हक्काची जमीन व बोअरवेल हडपण्या साठी मरणोत्तर माझ्या भावाची विटंबना केली. मी न्यायासाठी उंबरठे झिजवले पण न्याय मिळाला नाही,अशी व्यथा तक्रारदार मधुकर गव्हाणे यांनी मांडली.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांची मागणी
सर्व आरोपींना तात्काळ अटक करून सखोल चौकशी करावी,तलाठी व मंडळ अधिकारी यांचे निलंबन करून खाते निहाय चौकशी करावी,नोटरी वकिलाचा परवाना रद्द करण्यासाठी विधी विभागाकडे शिफारस करावी,मुंद्राक विक्रेता यांचा परवाना रद्द करावा.
महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी मयताला जिवंत दाखवून जमीन हडपण्यास मदत करणे हा नीचपणाचा कळस आहे.बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अशा प्रकारे बळकावल्या जात असतील तर सर्व सामान्य शेतकऱ्याने न्याय कुणाकडे मागायचा? असा संतप्त सवाल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केला आहे.



