सामाजिक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५- २६ च्या तालुकास्तरीय निकालात पारदर्शकता न राखता डावलल्याने आदर्श ग्राम पंचायत वाघोली ग्रामस्थांनी गांधीगिरी करत केले सामुहिक मुंडण व जन आक्रोश आंदोलन 

शेवगाव/प्रतिनिधी

राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात सलग तीन वर्षे राज्य स्तरीय पातळीवर प्रथम पुरस्कार प्राप्त वाघोली ता.शेवगाव या ग्राम पंचायतीस यावर्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या तालुकापातळी वरील परिक्षणातून बाद करण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध म्हणून पंचायत समिती कार्यालयासमोर गांधीगिरी आंदोलन करीत प्रतिकात्मक स्वच्छता व मुंडण आंदोलन केले.

शुक्रवार दि.२९ मे रोजी शुक्रवारी वाघोली ग्रामस्थ आखेगाव रस्त्यावरील स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या पुतळ्यापासून वाजत गाजत मोर्चाने पंचायत समिती कार्यालयामध्ये आले.या मोर्चात लहान मुले,महिला व ग्रामस्थ निषेधाचे फलक घेवून सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी कार्यालया समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन प्रांगण झाडून स्वच्छ केले.त्यानंतर पारंपारीक वाद्यांच्या गजरात लेझीम डाव खेळून गावावर झालेल्या अन्यायाचा निषेध केला. विविध वक्त्यांनी लोक सहभागातून केलेल्या रचनात्मक कामामुळे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त गाव असतांना देखील गावास डावलून इतर गावांना प्राधान्य दिल्याचे राजेंद्र जमधडे, बाबासाहेब गाडगे, भिमराज सागडे,कचरु चोथे,डॉ.निरज लांडे, शिवाजी भिसे,अनंता उकिर्डे,महादेव पाटेकर, गणेश म्हस्के,मयुरी ब्राम्हणे,संजय शिंदे आदींनी भाषणातून सांगितले.

तर पंचायत समितीच्या प्रवेशव्दारात उमेश भालसिंग यांच्या सह ग्रामस्थ व युवकांनी मुंडण करत पुरस्कार नको पण न्याय दया अशी मागणी केली. यावेळी उमेश भालसिंग म्हणाले की,गावाने गेल्या १० वर्षामध्ये लोक सहभागातून व श्रमदाना तून पर्यावरण संतुलना मध्ये व ग्रामविकासामध्ये रचनात्मक काम उभे केले आहे.वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,जलसंधारण, नदी खोलीकरण,बायो गॅस निर्मिती,विषमुक्त शेती,मुख्यमंत्री सोलर कृषी वाहीनी योजना, शिक्षण,आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे.मात्र यावर्षी मुख्यमंत्री पंचायत समृध्द पंचायतराज अभियानात परिक्षणासाठी आलेल्या समितीने आर्थिक हित संबंध जोपासत राजकीय दबावातून गावास तालुकास्तरावरच वगळले आहे.या अन्याय कारक परिक्षणामुळे अहोरात्र झटणा-या ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.त्यामुळे प्रशासनाने केलेले गुणांकन जाहीर करुन सर्व गावांचे दुस-यांदा परिक्षण करावे.तोवर जिल्हा,विभाग व राज्य पातळीवरील परिक्षण प्रक्रिया थांबवण्यात यावे. अन्यथा या विरोधात चौंडी येथे दि. ३१ मे रोजी मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करुन दाद मागणार आहोत.

सरपंच सुष्मिता भालसिंग,उपसरपंच कल्पना भालसिंग, हिराबाई शिंगटे,मोहन गवळी,संतोष आल्हाट, रावसाहेब शिंगटे, काकासाहेब आल्हाट, विष्णू घनवट,ज्ञानेश्वर उगले,सचिन लांडे, सुभाष बरबडे, बाळासाहेब देशपांडे आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी निवेदन स्विकारत याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांचे म्हणणे सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात गावाने केलेले स्वमुल्यांकन व प्रशासनाचे गुणांकन, गावांची निवड याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा प्रशासनाने केलेली नाही. तरी देखील पुढील स्तरावर गाव मुल्यमापन करण्याची लगबग सुरू आहे,ही गाव निवडतांना कुठले निकष लावले.याबाबत देखील गौडबंगाल आहे. त्यामुळे हे अभियान व त्यातील राजकीय हस्तक्षेपाबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे,असा आरोप ग्रामस्थांनी केला. याचा सोक्षमोक्ष लागे पर्यंत पुढील प्रक्रिया थांबवावी.अन्यथा.या बाबत मोठा प्रक्षोभ होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!