सामाजिक

पीएसीएल कंपनीतील अडकलेल्या गुंतवणूकदारांना न्याय द्या – बाजीराव ढाकणे  राष्ट्रपती व पंतप्रधानांना जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत निवेदन

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील हजारो गोरगरीब, कष्टकरी, ऊसतोड मजूर,शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांचे पीएसीएल लिमिटेड कंपनीमध्ये अडकलेले कोट्यवधी रुपये तातडीने परत मिळावेत,यासाठी केंद्र शासनाने विशेष कार्यवाही करावी,अशी मागणी महाएनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक श्री.बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केली आहे.

यासंदर्भा तील निवेदन मा. द्रोपदीजी मुर्मू राष्ट्रपती व मा.नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांना जिल्हाधिकारी,बीड यांच्या मार्फत सादर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.निवेदनात म्हटले आहे की,बीड जिल्ह्यातील अनेक गरीब,कष्टकरी,ऊसतोड मजूर व शेतमजूर कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टातून बचत केलेली रक्कम नोएडा स्थित पीएसीएल लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवली होती.मात्र मागील सुमारे पंधरा वर्षांपासून या गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये कंपनीमध्ये अडकून पडले असून अद्यापही अनेकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळालेले नाहीत.

या प्रकरणामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च भागविणे कठीण झाले असून आरोग्य उपचार,विवाह,घर बांधणी तसेच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.गरीब व कष्टकरी गुंतवणूकदारांना आपल्या हक्काच्या पैशासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

श्री.बाजीराव ढाकणे यांनी केंद्र शासनाने या प्रकरणात विशेष लक्ष घालून संबंधित मंत्रालय,सेबी तसेच इतर सक्षम यंत्रणांमार्फत तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी केली आहे. तसेच लोकसभेत हा विषय उपस्थित करून बीड जिल्ह्यातील सर्व पात्र गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम लवकरात लवकर परत मिळवून देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.गरीब,कष्टकरी व ऊसतोड मजुरांच्या न्यायासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करावी,अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!