सामाजिक

केज तालुक्यातील ग्राहकांना गॅससाठी ६० किमी फरफटीची वेळ; गॅस वितरणातील गैरसोयीविरोधात कृष्णा केदार व गंगाराम केदार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील ग्रामीण भागातील घरगुती गॅस ग्राहकांना सध्या मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी तब्बल ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करून बीड येथे जावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.या संपूर्ण प्रकरणात ग्रामीण ग्राहकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप करत ग्राहक कृष्णा केदार व गंगाराम केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत केज तालुक्यातील हजारो पात्र लाभार्थ्यांना घरगुती गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळावी स्वयंपाकासाठी सुरक्षित इंधन उपलब्ध व्हावे आणि आरोग्याच्या समस्या कमी व्हाव्यात या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली होती. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला होता.

विडा सर्कल परिसरातील अनेक ग्राहकांना प्रदीप गॅस एजन्सीमार्फत गॅस कनेक्शन व गॅस बुक देण्यात आले होते.अनेक वर्षांपासून ग्राहकांकडे संबंधित एजन्सीचे गॅस बुक असून त्याच माध्यमातून गॅस बुकिंग आणि वितरण प्रक्रिया सुरू होती.त्यामुळे ग्राहकांचा एजन्सीवर पूर्ण विश्वास होता.मात्र अलीकडील काही दिवसांत ग्राहक गॅस बुकिंगसाठी एजन्सीकडे गेल्यानंतर त्यांना धक्कादायक माहिती देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

ग्राहकांनी आधारकार्ड व गॅस बुक दाखविल्यानंतर आपले गॅस कनेक्शन आमच्या एजन्सीकडे नाही असे सांगण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रदीप गॅस एजन्सीच्या नावाने गॅस बुकांचे वाटप झाले, बुकिंग झाले,वितरण झाले मग अचानक हे कनेक्शन दुसरीकडे कसे वळविण्यात आले? याबाबत ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना का देण्यात आली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

ग्राहकांच्या म्हणण्या नुसार,त्यांचे गॅस कनेक्शन परस्पर सुरज गॅस एजन्सीकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र ही एजन्सी बीड येथे असल्याने केज तालुक्यातील ग्रामीण नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी थेट बीड गाठावे लागत आहे. विशेष म्हणजे अनेक गावांमधून बीडपर्यंतचे अंतर ५० ते ६० किलोमीटरपर्यंत आहे. त्यामुळे एका गॅस सिलिंडरसाठी पूर्ण दिवस खर्च करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे स्वतःचे वाहन नाही.त्यामुळे खासगी वाहन करून गॅस सिलिंडर आणावे लागत आहे.काही नागरिकांना भाड्याने ऑटो किंवा छोट्या वाहनांचा वापर करावा लागत असून सिलिंडर आणण्याचा खर्चच अनेकदा गॅसच्या किंमती इतका होत असल्याची परिस्थिती आहे.

त्यामुळे उज्ज्वला योजनेतून मिळालेला लाभ आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. अनेक कुटुंबातील पुरुष कामानिमित्त बाहेरगावी असल्याने महिलांनाच गॅस सिलिंडरसाठी धावपळ करावी लागत आहे.वृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच गरीब कुटुंबांसाठी ही समस्या आणखी गंभीर बनली आहे.गॅससाठी एवढी फरफट करायची असेल तर योजना नेमकी कोणासाठी?असा सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे.यासंदर्भात कृष्णा केदार व गंगाराम केदार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता गॅस कनेक्शन दुसऱ्या एजन्सीकडे कसे वर्ग करण्यात आले? यामध्ये नियमांचे पालन झाले का? तसेच ग्रामीण ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन केज तालुक्यात किंवा मस्साजोग परिसरात आठवड्यातून किमान एक दिवस तरी गॅस वितरणासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.तसेच संबंधित गॅस एजन्सींनी ग्राहकांना योग्य माहिती न देता दिशाभूल केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.अनेक ग्राहक आजही जुन्या गॅस बुक वर बुकिंगसाठी जात असून त्यांना अचानक कनेक्शन आमच्याकडे नाही असे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप दोन्ही वाढत आहेत.

दरम्यान,या संपूर्ण प्रकरणामुळे केज तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा,अन्यथा पुढील काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवून गॅस वितरणाची सुलभ व्यवस्था करावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!