
अंबाजोगाई/प्रतिनिधी
बीड येथील समर्थ लॉन्स येथे पार पडलेल्या मराठवाडा विभागीय अबॅकस स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील रुद्रम अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच सहभागात दैदीप्यमान यश संपादन करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.या स्पर्धेत रुद्रम अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिला, दुसरा,तिसरा तसेच चौथा क्रमांक पटकावला. वेगवान गणनाशक्ती, अचूकता, एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी परीक्षकांसह उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या उल्लेखनीय यशामुळे रुद्रम अबॅकस,बर्दापूर हे केंद्र अल्पावधीतच मराठवाड्यात गुणवत्तेचे प्रतीक ठरले असून विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत,शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेची शिस्तबद्ध प्रशिक्षणपद्धती यांचे हे यशस्वी फलित असल्याचे मान्यवरांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात गिरीश करडे, मणियार तसेच मास्टर ट्रेनर तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी,गोल्ड मेडल व अबॅकसची मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
रुद्रम अबॅकस,बर्दापूरच्या संचालिका संध्याराणी जाधव तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव,मानसिक तयारी आणि योग्य मार्गदर्शन दिले.त्यांच्या अथक परिश्रमांमुळे यंदा रुद्रम केंद्राला ‘उत्कृष्ट केंद्र’ हा मान मिळाला असून या केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या स्पर्धेत रुद्रम जाधव, ईश्वरी भोसले,अपेक्षा सूर्यवंशी यांनी ट्रॉफी जिंकत विशेष यश मिळवले,तर किशोरी सिरसाठ, कुणाल सिरसाठ,स्वरूप कांबळे, शाहनवाज देशमुख यांनी गोल्ड मेडल मिळवून केंद्राच्या यशात भर घातली आहे. स्पर्धेदरम्यान प्रेमला भोसले,श्रीदेवी सिरसाठ,किशोर भोसले, परमेश्वर सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली असून पालकांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षक, प्रशिक्षक व संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
शुभेच्छांचा वर्षाव
सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल,बर्दापूरचे मुख्याध्यापक श्री.मधुकर जाधव यांनी रुद्रम अबॅकसच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की,पहिल्याच प्रयत्नात मिळालेले हे यश अत्यंत अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेची गुणवत्ता याचे उत्तम उदाहरण आहे.त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
सरस्वती शाळेचे संस्था अध्यक्ष श्री.ताराचंद शिंदे यांनी ग्रामीण भागातून घडणारी गुणवत्ता प्रेरणादायी असल्याचे नमूद करत रुद्रम अबॅकस ने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री रेणुका प्राथमिक शाळा,बर्दापूरचे मुख्याध्यापक श्री.रमेश शिनगारे यांनी अबॅकस सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणनाशक्ती, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो असे सांगितले,तसेच या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल,असे मत व्यक्त केले आहे.विवेक ज्ञान मंदिर, बर्दापूरचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत इगवे यांनी पहिल्याच सहभागात मिळालेले हे दैदीप्यमान यश कौतुकास्पद असल्याचे सांगून रुद्रम अबॅकसचे सर्व विद्यार्थी, संचालिका संध्याराणी जाधव व शिक्षकवृंद यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व राष्ट्रीय पातळीवरही हे विद्यार्थी यशाचा झेंडा फडकावतील,असा विश्वास व्यक्त केला आहे.



