सामाजिक

भोंदू महाराजांपासून महिलासह समाजाने सावध व्हावे. – हनुमंत भोसले 

केज/प्रतिनिधी

सध्या भोंदूगिरीने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. चमत्कार,संतती प्राप्ती, आजार बरे करणे यासह घरातील समस्या दूर करण्याचा दावा करणारे लोक शंभर टक्के भोंदू असून हे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपने महिलांचे लैंगिक,आर्थिक शोषण करतात त्यामुळे अशा लोकांकडे महिला मुली व इतर लोकांनी अजिबात जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हाध्यक्ष हनुमंत भोसले यांनी केले आहे.

सध्या भोंदूगिरीचा आवाका प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. समाज जागृती व विविध सामाजिक संस्था व लोकांमुळे दररोज किमान एक दोन प्रकरणे बाहेर येत आहेत.असे भोंदू लोक गांव,तालुका किंवा जिल्हा पातळीवर अध्यात्माचा व देव धर्माचा आधार घेवून रनणिती आखून आपला भोंदूगिरीचा धंदा सुरु करतात.

सुरुवातीला ते अत्यंत हुशारीने समाजाचा विश्वास प्राप्त करतात व हळू हळू शोषण करायला सुरुवात करतात. प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या भारता सारख्या देशात बेरोजगारी, नोकरी -धंदा वेळेत न मिळणे, आरोग्याच्या वाढत्या समस्या, कांही पती पत्नीच्या शारीरिक दोषामुळे संतती वेळेत न होणे यासह इतर मानसिक आजाराने समाज समस्याग्रस्त झालेला आहे. आपल्या समस्येवर झटक्यात उपाय न झाल्यास समाजातील कर्मकांडे व चमत्कारावर विश्वास असणारा मोठा वर्ग अशा भोंदू लोकांच्या दरबारात हजेरी लावतात.

करणी, भानामती,भुतबाधा यासारख्या थोतांड व अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवून हे लोक अशा भोंदू लोकांचे शिकार बनतात.बीड जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बीड जिल्ह्यात तांडा,गांव व तालुका पातळीवरील अशा लोकांवर पाळत ठेवली असून बीड पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कायद्या आधारे कठोर कार्यवाही व्हावी व ते पुन्हा सुटू नयेत यासाठी त्यांच्या भोंदूगिरीचे पुरावे व तक्रारदाराच्या तक्रारीसह केस भक्कम करण्या साठी नियोजनबाद्द कार्यवाही केली जाणार आहे.

यासाठी समाजाने संपूर्ण सहकार्य करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी म्हटले आहे.हे काम केवळ महाराष्ट्र अंनिस चे आहे हा गैरसमज सर्वांनी दूर करावा.हे काम मोठे आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्र अंनिसवर ही जबाबदारी सोडणे योग्य नाही.खरे पाहता हे काम एकट्या अंनिस चे नसून समाजातील वैद्यकीय क्षेत्र,सामाजिक संस्था व शिक्षण क्षेत्रासह प्रशासन व लोकप्रतिनिधीचे यांचे ही आहे.मात्र यातील अनेक माध्यमे ‘हे काम’ प्रवाहाच्या विरोधातील असल्याने पुढे येत नसल्याचेही हनुमंत भोसले यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या परिसरातील अशा भोंदू लोकांची नावे,पूर्ण पत्ता, पुराव्याचे व्हिडिओ व इतर सविस्तर माहिती सह बीड जिल्हाध्यक्ष हनुमंत भोसले (9423733888) किंवा जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण ( 94214 43172) अथवा जिथे महाराष्ट्र अंनिस च्या तालुका शाखा आहेत त्या तालुका समितीकडे द्यावेत असेही जिल्हा शाखेने कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!