सामाजिक

गॅस तुटवड्याच्या चर्चेमुळे एजन्सी समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा,टाकीचे वजन करूनच घ्या -लिंबराज गायकवाड वंचित बहुजन आघाडी

केज/प्रतिनिधी

इराण–इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई ची चर्चा सुरू झाल्याने त्याच्या झळा आता महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने केज शहरात गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वितरण प्रणालीत सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

नव्या नियमानुसार दोन सिलिंडर घेण्यामधील कालावधी वाढविण्यात आला असून ग्रामीण भागात ४५ दिवसांनंतर तर शहरी भागात ४० दिवसांनंतरच नवीन सिलिंडरचे बुकिंग करता येणार आहे.यापूर्वी हा कालावधी २५ दिवसांचा होता.या नव्या नियमा मुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान,मोबाईलवरून गॅस बुकिंग होत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत.त्यामुळे अनेक नागरिक थेट गॅस एजन्सीवर येऊन बुकिंग साठी गर्दी करतानादिसत आहेत.सकाळपासूनच एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.उन्हाचे चटके सहन करत अनेक नागरिक रिकाम्या गॅस टाक्या घेऊन रांगेत उभे असल्याचे चित्र सध्या केज शहरात दिसत आहे.

दरम्यान,नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस टाकीचे प्रत्यक्ष वजन करून नागरिकांना दाखवण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते लिंबराज गायकवाड, प्रवक्ते प्रदिप गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, गॅस टाकी घेताना तिचे वजन तपासूनच ती स्वीकारावी,कारण काही वेळा कमी वजनाची टाकी दिली जाण्याची शक्यता असते.

तसेच गॅस वितरण केंद्रांवर ग्राहकांना योग्य सेवा मिळावी, टाकीचे अचूक वजन असावे आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.एकूणच युद्धजन्य परिस्थिती,गॅस बुकिंग वरील नव्या अटी आणि सिलिंडर तुटवड्याच्या चर्चेमुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून केज शहरात गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!