केज येथे मराठवाडा साहित्य परिषदेकडून माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,जागतिक महिला दिनानिमित्त विचारमंथन

केज/प्रतिनिधी
केज येथे मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने माजी कुलगुरू दिवंगत डॉ.जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सामाजिक प्रश्नांवरही विचारमंथन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.जनार्दन वाघमारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या वेळी त्यांच्या साहित्य,शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. वाघमारे यांच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषेत रूपांतर करून त्यांच्या विचारांचे व्यापक स्तरावर प्रसार करणारे प्रा.डॉ.सुनील राऊत यांनी वाघमारे सरांच्या जीवनचरित्रावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी वाघमारे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला असलेली गरज अधोरेखित केली.याच कार्यक्रमात मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ कवयित्री सौ.सीमाताई गुंड यांनी महिलांची सध्याची सामाजिक स्थिती,त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, तसेच भविष्यकाळातील आव्हाने या विषयावर प्रभावीपणे आपले विचार मांडले.दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचे सक्रिय सदस्य व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर यांची नुकतीच नवी दिल्ली येथे आयोजित शाश्वतविकास परिषद प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ.सौदागर यांनी पर्यावरणातील जैविक व अजैविक घटक परस्परांवर अवलंबून असल्याचे सांगितले.या घटकांपैकी कोणताही घटक नष्ट झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणीय संतुलनावर होऊ शकतो.त्यामुळे मानवाच्या शाश्वत विकासासाठी या दोन्ही घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.नवनाथ काशीद, अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद शाखा केज यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात पर्यावरण संवर्धनासाठी जैविक घटकांचे जतन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.तसेच भविष्य कालीन महिला सबलीकरणाच्या धोरणां वरही त्यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.
या कार्यक्रमाला मराठवाडा साहित्य परिषदेचे सहयोगी सदस्य श्री.जी. बी.गदळे,श्री एम.डी.घुले, श्री.विक्रम डोईफोडे,श्री. जनार्दन सोनवणे,श्री. महादेव सुवर्णकार,श्री. हरिभाऊ शिंदे,श्री.अरुण शिंदे, श्री.हनुमंत भोसले, श्री.श्रावणकुमार जाधव, श्री.माधव गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विक्रम डोईफोडे व श्री एम.डी.घुले यांनी केले.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



