सामाजिक

केजच्या न्यायालयातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड ! जेष्ठ विधिज्ञ जनार्धनराव आदमाने यांचे निधन.

केज/प्रतिनिधी

केज येथील प्रसिद्ध वकील अॕड.जनार्धनराव आदमाने यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने बीड येथे निधन झाले.केजच्या न्यायालयाला सतत ‘व्हायब्रेट’ ठेवून चैतन्य निर्माण करणारे जेष्ठ विधिज्ञ जनार्धनराव आदमाने यांचे केजच्या वकिली व्यवसायात अत्यंत आदराचे स्थान होते.वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वकिली व्यवसायात राहून इंग्रजी विषयावरील त्यांचे प्रभुत्व व संवाद कौशल्याने त्यांनी इतरांवर मोठी छाप टाकली होती. केज येथून इंडियन एक्सप्रेस सारख्या राष्ट्रीय दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले.त्यांच्या या ज्ञान व संवाद कौशल्याचा अनेकांना हेवा वाटायचा. अवघड व कठीण वाटणारे इंग्रजी भाषेतील मसुद्यांचा मराठी भाषेत अनुवादीत करण्यासाठी अनेक लोक त्यांचे मार्गदर्शन घेत असत.

त्यांच्या अवांतर ज्ञानाचा आवाका ही खूप मोठा होता.खुप सामान्य व साधेपणाचे जीवन जगताना त्यांचा पेहराव अत्यंत टापटीपीचा व शिस्तबद्ध असायचा. वयाच्या सत्तरी नंतर कडाक्याच्या थंडीतही त्यांचं धावणे व व्यायाम सुरूच होता.सकाळी पहाटे चार वाजता उठून त्यांच्या संपर्कातील लोकांना ते दरवाजावर हाक देऊन जागे करायचे.

त्यांचे जीवन नवीन पिढीला प्रेरणादायी होते. ते धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील मूळ निवासी होते.बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन विवाहित मुली आहेत.सध्या ते बीड येथे मुलीकडेच राहत होते. त्यांच्या सर्वच मुलींनी त्यांची अखेरपर्यंत खुप सेवा करून त्यांना मुलगा नसल्याची उणीव कधीच भासू दिली नाही.त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ठीक ११ वाजता बीड येथील संत भगवान बाबा स्मशानभूमीत येथे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी नातेवाईकांसह, इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

केज न्यायालय,रोटरी क्लब ऑफ इंडिया केज, सर्व सामाजिक संस्था व केजवासियांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!