केज शहरामध्ये १ मार्च रोजी महास्वच्छता अभियान, महाराष्ट्रातील 2 हजार स्वच्छता दूत होणार सहभागी

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने केज शहरात प्रथमच रविवार दि.१ मार्च रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत ऐतिहासिक महास्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून यावेळी शहरातील सर्व प्रमुख रस्ते,भाग आणि शासकीय कार्यालये यांचा परिसर स्वच्छ करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.रविवारी सकाळी ठीक ७ वाजता श्री छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथून एका छोट्या कार्यक्रमाने या मोहिमेस सुरुवात होणार आहे.
केज शहरामध्ये रविवारी पार पडणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणचे दोन हजाराहून अधिक सदस्य सहभागी होणार आहेत.यासाठी लागणारी भोजन व्यवस्था,हातमौजे,झाडू व मास्क इत्यादी स्वच्छता साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने पुरविण्यात येणार असून केवळ जमा केला जाणारा कचरा उचलण्यासाठी वाहनाची मदत केज नगरपंच्यायत कडून घेतली जाणार आहे.या उपक्रमांतर्गत केज शहरातील श्री छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते -डॉ.थोरात यांचे हॉस्पिटल, शिक्षककॉलनी, विठाईपुरम, कामगार नगर, उमरी रोड,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बालाजी मंदिर, जय भवानी चौक, मंगळवार पेठ कॉर्नर, कानडी रोड इत्यादी भागात स्वछता केली जाणार आहे.
डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक अध्यात्मिक प्रतिष्ठान असून या प्रतिष्ठानद्वारे स्वच्छता मोहिमेसह, वृक्षारोपण व संगोपन, महाआरोग्य शिबीरे, दिव्यांगासाठी आवश्यक साहित्य वाटप,कर्ण बधिरासाठी श्रवणयंत्रे वाटप,शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, व दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जलस्रोत निर्माण करणे इत्यादी सामाजिक उपक्रम राबविले जातात.या प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोहिमेची लिमका बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे.
या प्रतिष्ठान च्या कार्याची दखल घेऊन डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा स्वच्छतादूत म्हणून नेमणूक केलेली आहे.ही मोहीम अधिक यशस्वी पणे पूर्ण करण्यासाठी केज शहरातील समाजप्रेमी युवक -युवती, विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.



