बीड जिल्हाधिकाऱ्यांना बहुजन विकास मोर्चाचे निवेदन ; आंबेडकर जयंतीला दोन बेस-दोन टॉप डीजेला परवानगी देण्याची लखन हजारे यांची मागणी

केज/प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बीड जिल्ह्यात डीजे व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि आंबेडकरी अनुयायांच्या भावना लक्षात घेऊन ‘२ बेस २ टॉप’ या मर्यादेत डीजेला कायदेशीर परवानगी द्यावी,अशी मागणी बहुजन विकास मोर्चा केज ता.अध्यक्ष लखन हजारे यांच्या वतीने करण्यात आली आहे. केज येथे दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांना यासंदर्भातील निवेदन प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.
व्यावसायिकांच्या उपासमारीचा प्रश्न
निवेदनात नमूद केल्या प्रमाणे,गेल्या काही काळापासून डीजे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.वर्षभरातील महत्त्वाच्या सणउत्सवात जर त्यांना काम मिळाले नाही,तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने डीजे व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा सहानुभूती पूर्वक विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
धार्मिक व सामाजिक भावनांचा आदर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर उत्साहात साजरी केली जाते.या दिनी भीमगीते वाजवण्या साठी आंबेडकरी समुदायामध्ये मोठा उत्साह असतो.जन भावना आणि उत्सवाचे स्वरूप विचारात घेऊन बीड जिल्ह्यात किमान ‘दोन बेस दोन टॉप’ या मर्यादेत डीजे लावण्यास कायदेशीर परवानगी मिळावी,अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.



