मराठी शाळा आणि आपली जबाबदारी निभावण्याची गरज. -सौ.जयश्रीताई कोकीळ क्षिरसागर

केज/ प्रतिनिधी
शाळा मराठी माझी शाळा मराठी रं | या गीताचे बोल कानावर पडले आणि खरंच मनात विचार आला माझी शाळा.मराठी शाळा हीच खरी शाळा.मी मराठी शाळेत शिकले आणि शिकवते याचा मला सार्थ अभिमान आहे ;परंतु आजची परिस्थिती पाहता मराठी शाळा किती वर्षापर्यंत अस्तित्वात राहतील? हा खरा प्रश्न आहे आणि या चिंतेने मन व्याकूळ होते. मराठी शाळा वाचवणे ही काळाची गरज आहे. आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी आणि भाषेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी मराठी शाळा वाचणं अतिशय गरजेचं आहे.
इंग्रजी शाळेचा वाढत चाललेलं प्रमाण आणि पालकांचा इंग्रजी शाळांकडे असणारा ओढा ही एक चिंतेची बाब बनली आहे.त्या चिंतेसाठी आपणच जबाबदार आहोत. सुरुवातीला कौतुक म्हणून सुरू झालेल्या या शाळा आता मराठी शाळांचा गळा दाबत आहेत असं वाटतं. यासाठी येत्या काळात काही भूमिका घेतली नाही किंवा प्रयत्न केले नाहीत तर काही काळा नंतर मराठी शाळांचं अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती वाटते. इतक्या दीर्घ प्रवासानंतर मराठी भाषेला जागतिक भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि ती टिकवण्या साठीचं प्रयत्न करावे लागणे यासारखी खेद जनक बाब कोणतीच असू शकत नाही.
मला वाटते आपले राजकारणी ही या गोष्टीला तितकेच जबाबदार आहेत.वाटेल त्याला काही तुटपुंज्या सुविधा कागदावर दाखवल्या की इंग्रजी शाळांना परवानगी मिळते मग एकदा परवानगी मिळाली की या शाळा आपला मनमानी कारभार चालवण्यासाठी सज्ज होतात.मग पालकांकडून भरमसाठ फी घेऊन आणि पालकांना वेगवेगळ्या गोष्टींचे प्रलोभन दाखवून ही लोकं अक्षरशः पालकांची लूट करतात पणम्हणतात ना ‘अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी’ तशी अवस्था पालकांची होते. त्यांना एकदा टाकलेलं पाऊल मागे घेता येत नाही.
संस्थानिकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते.सुरुवातीला कौतुक म्हणून वाटणारी गोष्ट नंतर जीवघेणी होते पण तेव्हा काहीचविलाज नसतो आपल्या मुलांना सुटा बुटामध्ये आणि बसच्या प्रवासामध्ये पाहण्यासाठी पालकांना हौस वाटते पण हीच हौस नंतर त्यांच्या अंगलट येते.खरी चिंता आहे ती मराठी शाळा किंवा सरकारी (जिल्हा परिषदच्या महानगर पालिकेच्या शाळा) बंद होण्याची.शहरी भागात आणि शहरांजवळच्या ग्रामीण भागामध्ये तर हे प्रमाण खूपच वाढत आहे.
खाजगी शाळां सारख्या सोयीसुविधा पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांना नव्हत्या अगदी मंदिरात,गावातील पारावर,मोकळ्या जागी शाळा भरायच्या पण तरी शाळा आणि वर्ग विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले असायचे.परंतु आता सर्वसोयीसुविधांनी युक्त असलेल्या अनेक सरकारी मराठी शाळा बंद पडल्या आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गांवर आहेत.गावातली मराठी शाळा सोडून विद्यार्थ्यांच्या बस भरून विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे धाव घेत आहेत हे चित्र बदलायला हवे यासाठी प्रत्येक मराठी माणसाने खंबीर भूमिका घ्यायलाच हवी.मराठी शाळा वाचवायला हवी.मराठी शाळा वाचवण्यासाठी आपल्या घरातील आपल्या मुला मुलींना तसेच शेजारीपाजारी यांना मराठी शाळेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.मराठी शाळे मध्येच का प्रवेश घ्यायचा हे त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.मराठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांना प्रेरित करणे आणि मराठी शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
‘शाळेला गावचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा’असं म्हणतात त्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावातील मराठी शाळा वाचवण्यासाठी खारीचा वाटा उचलायला हवा तरच ती हसती खेळती मुलं शाळेच्या अंगणात बागडताना दिसतील आणि बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू होतील बंद पाडण्याच्या मार्गावर असणाऱ्या शाळा पूर्ववत सुरु होतील.
संस्थानिकांनी थोडा मोह सोडायला हवा.दर्जेदार मराठी शाळा निर्माण होणं आणि त्या चालणं ही मराठीची खरी गरज आहे.सर्वांनी प्रतिज्ञा घ्यायला हवी की मी माझी मुलं,नातवंड या मराठी शाळेत शिकवीन मराठी शाळा हे महाराष्ट्राचे वैभव आहे सुसंस्कार होतात ते मराठी शाळांमधूनच.संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, संत रामदास.संत जनाबाई इत्यादी संतांचा वारसा जपायचा असेल तर मराठी शाळेला पर्याय नाही.जय मराठी जय महाराष्ट्र असे सौ.जयश्रीताई कोकीळ क्षिरसागर यांनी म्हटले आहे.



