नाव्होली परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार तीन किलोमीटर नदी सरळीकरण व खोलीकरण कामाचा अक्षय मुंदडांच्या हस्ते धडाक्यात शुभारंभ

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील नाव्होली येथील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्याआणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या नदी सरळीकरण व खोलीकरण कामाचा शुभारंभ दि.१२ फेब्रुवारी रोजी गुरुवारी करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे परिसरातील जलस्त्रोत पुनरुज्जीवित होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पाणी साठवण क्षमतेत होणार मोठी वाढ नाव्होली ते दैठणा या दरम्यान सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या नदीपात्राचे काम हाती घेण्यात आले आहे.सद्य स्थितीत नदीपात्रात साचलेला गाळ आणि नागमोडी वळणांमुळे पाण्याचा प्रवाह अडथळा ठरत होता.आता या कामामुळे पाणी साठवण होणार आहे.नदीपात्राची खोली वाढल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होईल.भूजल पातळीत वाढ होऊन जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढून परिसरातीलविहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत लक्षणीय सुधारणा होईल.यामुळे
शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे.भविष्यात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
हा उपक्रम केवळ पाण्यासाठी नसून नाव्होली परिसरातील ग्रामीण विकासाचा एक नवा अध्याय आहे.यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पिकांसाठी दीर्घकालीन दिलासा मिळणार आहे.यावेळी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या प्रसंगी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी या कामाचे स्वागत करत प्रशासकीय आणि स्थानिक प्रयत्नांचे कौतुक केले.जलसंधारणाच्या या कामामुळे नाव्होली आणि दैठणा परिसराचा कायापालट होणार असून,दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे असे बोलले जात आहे.



