कृषीसामाजिक

परळीतील ऐतिहासिक महापशूधन एक्स्पोचे शुक्रवारी ना.पंकजाताई मुंडेंच्या हस्ते उद्घाटन ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५ ऐवजी १४ तारखेला येणार,पशू प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात; एक हजाराहून अधिक विविध पशूंचा सहभाग,बीडसह राज्यातील पशू पालकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे केले आवाहन 

परळी वैजनाथ/प्रतिनिधी

प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक व भव्य असे राष्ट्रीय स्तरा वरील महापशुधन एक्स्पो पहिल्यांदाच भरत आहे. या पशू प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होत आहे.दरम्यान,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार १४ तारखेला परळीत येणार आहेत.

परळी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील ओपळे मैदानात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातींचे एक हजाराहून अधिक पशू सहभागी होणार असून प्रदर्शनाच्या जय्यत तयारीला सध्या वेग आला आहे.शुक्रवारी १३ तारखेला सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

मुख्यमंत्री १५ ऐवजी १४ तारखेला परळीत येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निमंत्रण पत्रिकेनुसार प्रदर्शनाच्या समारोपाला म्हणजे रविवारी १५ तारखेला येणार होते परंतु ते आता शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्याउपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पशुप्रदर्शन ऐतिहासिक

या प्रदर्शनात पशु पालकांना गायी,म्हशी, घोडे,शेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळणार आहेत.केवळ महाराष्ट्रच नव्हे,तर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे.राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे.परळी वैजनाथ येथेप्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधना साठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

हा अत्यंत सुंदर योगायोग महाशिवरात्र आणि महा पशुधन एक्सपो हा अत्यंत सुंदर योगायोग आहे.या खात्याची मंत्री म्हणून परळीत असे प्रदर्शन व्हावे अशी माझी इच्छा होती.

नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशु पालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!