
केज/प्रतिनिधी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या २०२५च्या खरीप,रब्बी हंगामातील सोयाबीन, कापूस,तूर,उडीद,मूग, बाजरी,गहु,ज्वारी आदी प्रकारच्या सुमारे पाच लाख क्विंटल शेतमाला ची १००० ते २५०० रुपये कमी दरात खरेदी बीड जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात करण्यात आली असुन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, शेकाप चे जिल्हा संघटक धनंजय मूळे,शेतकरी नेते राजेंद्र वीर,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड शहराध्यक्ष श्रीकृष्ण कोलंगडे,महिला आघाडीच्या नयना भाकरे यांनी सदर नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदारी निश्चित करावी तसेच कमी दर देणाऱ्या मार्केट कमिटीच्या अंतर्गत शेतमाल खरेदी -विक्री परवान्यांचे नूतनीकरण स्थगित करण्याची मागणी जिल्हाधिकारी,जिल्हा उप निबंधक,जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवार दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा उपनिबंधक,मार्केट कमिटीचे सचिव,कृषि पणन मंडळाचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, शेतकरीसंघटना प्रतिनिधी यांच्यात दि.१९नोव्हेंबर २०२५ रोजी संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत कलम ३२ (ड )प्रमाणे किमान आधारभूत किंमत न देणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डा तील खरेदीदारा विरुद्ध कार्यवाही करण्याचे ठराव मंजूर केले होते.मात्र मार्केट कमिटीच्या सचिवांनी जाणीवपूर्वक कोणावरही कार्यवाही केली नाही.आढावा बैठकीत जिल्ह्यातील मार्केट कमिटींच्या सचिवांनी सोयाबीन, कापूस, तूर,बाजरी,ज्वारी, गहू आदी प्रकारचा सुमारे पाच लक्ष क्विंटलशेतमाल बाजार समिती आवारात लिलावाद्वारे खरेदी करण्यात आला असून त्याची मार्केट फिस वसुल केल्याचे मान्य केले आहे. ज्या शेतमालाची मार्केट फीस वसूल केली जाते .त्या शेतमालाला केंद्र शासनाकडून निर्धारित केलेले किमान आधारभूत दर देणे क्रमप्राप्त आहे.
सुमारे ५ लाख क्विंटल शेतमालाला १००० ते २५०० रुपयापर्यंत कमी दर देणाऱ्या खरेदीदारा विरुद्ध शेतकऱ्यांना विना विलंब तात्काळ नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी निश्चित करावी तसेच २०२६ साठी मार्केट कमिटीकडे शेतमाल खरेदी-विक्री परवान्यांचे नूतनीकरणासाठी येणारे प्रस्ताव स्थगित करावेत. अशी निवेदनाद्वारे मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,शेकापचे जिल्हा संघटक धनंजय मुळे,शेतकरी नेते राजेंद्र वीर,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड शहराध्यक्ष श्रीकृष्ण कोलंगडे,महिला आघाडीच्या नयना भाकरे यांनी जिल्हाधिकारी बीड, जिल्हा उपनिबंधक,बीड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी,कृषि पणन मंडळ,बीड यांना केली आहे.



