शिवसेना सामाजिकन्याय विभागाचे उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमारे यांचे केज येथे जंगी स्वागत, नियुक्तीबद्दल पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार ; सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व तरुणांचा मोठा सहभाग

केज / प्रतिनिधी
शिवसेना सामाजिकन्याय विभागाचे नवनियुक्त उपाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) तथा मराठवाडा कार्यक्षेत्र प्रमुख लक्ष्मण वाघमारे हे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता केज येथे दाखल होताच त्यांचे शहरात भव्य व उत्साहात स्वागत करण्यात आले. सामाजिक न्यायाच्या चळवळीत सक्रिय योगदान देणाऱ्या वाघमारे यांच्या नियुक्तीबद्दल केज शहरात समाधान व्यक्त करण्यात येत असून,याच पार्श्वभूमीवर हा स्वागत व सत्कार सोहळा पार पडला.याप्रसंगी पुष्पगुच्छ व शाल देऊन लक्ष्मण वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ नागरिक,सामाजिक चळवळीतील अनुभवी नेते,पत्रकार बांधव तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी वाघमारे यांच्या नियुक्तीचे स्वागत करत त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या स्वागत कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते महादेव लांडगे, रमेश पाटोळे,सचिन गालफाडे,सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे व खरात,तसेच आझाद क्रांती सेनेचे केज तालुका प्रमुख शरद थोरात,मानवी हक्क अभियानाचे धारूर तालुका अध्यक्ष लोखंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकार तथा शेतकरी जनहित कामगार मंचाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पांडुरंग कसबे यांनी लक्ष्मण वाघमारे यांचे अभिनंदन करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.सामाजिक न्याय, शेतकरी प्रश्न,कामगार हक्क आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून वाघमारे यांच्या कडून मराठवाडा विभागाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या भावना व्यक्त करताना लक्ष्मण वाघमारे यांनी केज वासीयांचे आभार मानले. शिवसेना सामाजिकन्याय विभागाच्या माध्यमातून गरजू,वंचित,दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांच्या प्रश्नांनाप्राधान्य देत कार्य करणार,तसेच मराठवाडा विभागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी शासन दरबारी प्रभावीपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षप्रमुख श्री. एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आमदार श्री.राम पंडागळे यांनी दिलेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील,असेही त्यांनी नमूद केले.या स्वागत सोहळ्यामुळे केज शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लक्ष्मण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे कार्य अधिक गतिमान व प्रभावी होईल, अशी अपेक्षा शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केली आहे.



