सणासुदीच्या काळात बुलडोझर नको, अतिक्रमण कारवाई स्थगित ठेवण्याची आझाद क्रांती सेनेची ठाम मागणी

केज/प्रतिनिधी
केज शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई तात्काळ थांबवून ती भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती नंतरच करण्यात यावी,अशी ठाम व आक्रमक मागणी करत आझाद क्रांती सेनेच्या वतीने केज तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.हे निवेदन आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद थोरात तसेच तालुका उपप्रमुख अनिल लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की,केज शहरातील अतिक्रमण धारकांमध्ये प्रामुख्याने गोरगरिब, अल्पसंख्याक व बहुजन समाजातील कुटुंबांचा समावेश असून त्यांची संपूर्ण उपजीविका याच छोट्या व्यवसायांवर अवलंबून आहे.
अशा परिस्थितीत रमजानचा पवित्र महिना,छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रमजान ईद आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या महत्त्वाच्या सणांच्या काळात अतिक्रमण कारवाई करणे म्हणजे सामान्य नागरिकांवर अन्यायकारक आघात ठरणार असल्याचे मत आझाद क्रांती सेनेने व्यक्त केले आहे.ऐन सणासुदी च्या दिवसांत बाजारपेठां मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.या काळात जबरदस्तीची कारवाई झाल्यास शहरात तणाव, असंतोष व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात नमूद आहे.
केज शहरातील सामाजिक सलोखा, शांतता आणि सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता अतिक्रमण हटवण्याची कारवाई डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतरच करण्यात यावी,अन्यथा आझाद क्रांती सेना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देईल,असेही या निवेदनातून स्पष्टकरण्यात आले.या निवेदनावर इरफान पठाण,लहू लक्ष्मण गिरी,बाबुराव गालफाडे,दगडू गालफाडे, विमल उत्तरेश्वर वैरागे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



