
केज/प्रतिनिधी
शेतकरी,शेतमजूर व कामगारांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने सातत्याने संघर्ष करणाऱ्या शेतकरी जनहित कामगार मंच,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि.७ जानेवारी २०२६रोजी सायंकाळी ४ वाजता पंचायत समिती सभागृह,केज येथे भव्य राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या बैठकीस राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी,तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकरी व कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करताना जमीन,पाणी, वीज,रस्ते,पिकांचे दर, कर्जमाफी, पीकविमा, रोजगार व सामाजिक सुरक्षा या विषयांवर संघटनेच्या संघर्षाची दिशा स्पष्ट करण्यात आली.
सरकारने तात्काळ निर्णय घ्यावेत – पांडुरंग कसबे
शेतकरी जमीन कामगार मंचाचे पांडुरंग कसबे यांनी आपल्या विचारांमध्ये शासनाच्या शेतकरी,कामगारविरोधी धोरणांवर टीका करताना, गायरान धारकांना ७/१२ हक्क, उसतोडकामगारांना ₹१० लाख विमा संरक्षण, सरसकट पीककर्ज माफी, पिकांना हमीभाव व तातडीने पीकविमा या प्रमुख मागण्यांवर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा,अशी ठाम भूमिका मांडली.
संघटनेचा संघर्ष शेतकऱ्यांसाठी अपरिहार्य –श्रीपती सोळुंके
संघटनेचे पदाधिकारी श्रीपती सोळुंके यांनी मनोगतात सांगितले की, शेतकरी व कामगारांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी ही संघटना एक भक्कम व्यासपीठ ठरत असून, भविष्यात हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
सामान्यांच्या हितासाठी सातत्याने काम – राहुल रोकडे
धारूर तालुका अध्यक्ष माननीय राहुल रोकडे यांनी संघटनेच्या कार्य पद्धतीवर प्रकाश टाकत, शेतकरी,कामगार आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी संघटना जे निर्णय घेते व भविष्यात घेणार आहे,त्याची सविस्तर माहिती दिली.
संघटना म्हणजे संघर्ष व संवेदनशीलता – गायसमुद्र
संघटनेचे गायसमुद्र यांनी संघटनेच्या कामकाजाची दिशा स्पष्ट करताना,ही संघटना केवळ आंदोलना पुरती मर्यादित नसून, पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन मदतीचा हात देणारी संवेदनशील चळवळ असल्याचे सांगितले.
तरुण,महिला,शेतकरी व कामगारांसाठी लोकशाही व्यासपीठ – मा.जयवंत कांबळे व गायकवाड
संस्थापक अध्यक्ष श्री. कांबळे साहेब व सचिव दिपकजी गायकवाड साहेब यांनी तरुण, महिला,शेतकरी व कामगारांना शासन दरबारी आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेतकरी जनहित कामगार मंच एक सक्षम लोकशाही माध्यम ठरत असल्याचे नमूद केले.महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करण्याचे भाग्य संघटनेला लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आयोजकांचे आभार
या यशस्वी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन श्री.पांडुरंग कसबे यांनी केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.शेतकरी–कामगारांच्या हक्कांचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करत मेळाव्याची सांगता करण्यात आली.



