केज बायपास व बसडेपो साठी केज विकास संघर्ष समितीचे पुन्हा आंदोलन

केज/प्रतिनिधी
केज येथे रिंग रोड बायपास किंवा उड्डाणपूल आणि केज येथे बसडेपो तात्काळ मंजूर करा या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचापवित्रा घेतला असून नवीन वर्षात यामागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी दिला आहे.समितीच्या वतीने केज विधानसभेच्या आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा व केज तहसीलदार यांना निवेदनाच्या प्रती देऊन वरील दोन्ही प्रश्नावर शासन दरबारी कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून आ.नमिताताईंनी केजवासियांचे हे महत्वाचे दोन प्रश्न अधिवेशनात मांडण्याचीही विनंती केली आहे.केज शहर सध्या खामगाव- पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर या महामार्गाच्या जोडणी वर आहे.वरील दोन्ही महामार्ग वाहतूकीसाठी सुलभ व सोयीचे झाले असल्याने या वरील वाहतूक खूप पटीने वाढली आहे.यामध्ये
अवजड वाहनांची संख्या ही वाढली आहे. परिणामता केज शहर अंतर्गत भागात अपघातांची संख्याही वाढली आहे.शहरातील नागरिक,विद्यार्थी व वृद्धाना पायी चालणे अवघड झाले आहे. यासाठी आता केज शहरांतील अंतर्गत भागात रस्त्यालगत फुटपाथ बनवणे गरजेचे आहे व सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी आता बायपास (रिंगरोड) अथवा उड्डाणपुल यापैकी जे सोयीचे व फायद्याचे आहे ते मंजूर करून तयार करावे.
याशिवाय केज शहरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बीड रोड लगत बसडेपो साठी साडेसात एकर जमीन आरक्षित केलेली आहे.याठिकाणी बसडेपो मंजूर करून सुरु करावा अशी समितीची केज वासियांच्या वतीने अनेक दिवसापासून मागणी आहे.शासनाच्या नवीन धोरणानुसार इलेक्ट्रिक चार्जींग सेंटर व ई बसडेपो सुरु करणेही सोयीचे आहे.
यासाठीही समिती सतत पाठपुरावा करत आहे.तरी याबाबत आमदार महोदया व शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी समितीने मागणी केली आहे.याबाबत निवेदनाच्या प्रती आमदार नमिताताई मुंदडा व केज तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर हनुमंत भोसले,नासेर मुंडे, शेषराव घोरपडे व इंजिनियर मोहनराव कराड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



