सामाजिक

जनतेचा नेता आजही जन मनात जिवंत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विशेष 

महाराष्ट्राच्या राजकारणात लोकनेते म्हणून ओळख निर्माण केलेले आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अविरत लढा देणारे गोपीनाथराव मुंडे यांची जयंती १२ डिसेंबर रोजी साजरी करण्यात येत असून त्यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने आज राज्यभरात विविध स्मरण कार्यक्रम होत आहेत.दि.१२ डिसेंबर १९४९ रोजी जन्मलेले गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्रातील एक प्रभावशाली भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रमुख नेते होते. संघर्षातून नेतृत्वाच्या सर्वोच्च पदांपर्यंत पोंहोचलेला त्यांचा प्रवास आजही प्रेरणादायी मानला जातो.स्व.मुंडे साहेबांनी मराठवाड्या तील ग्रामीण जीवन, दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट,सिंचन व्यवस्था आणि जलसंपत्ती या मुद्द्यांवर नेहमीच ठाम भूमिका घेतली.

शेतकऱ्यांना न्याय आणि शेती मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठीत्यांनी केलेला सातत्यपूर्ण लढा सामान्य शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्याप्रती दृढ विश्वास निर्माण करणारा ठरला.मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन प्रकल्प आणि शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी केलेली धडपड आजही स्मरणात आहे. राजकीय क्षेत्रात विद्यार्थी आंदोलना तून सुरुवात करून ते विरोधी पक्षनेतेपदी पोंहोचले आणि नंतर राज्य सरकार मध्ये उपमुख्यमंत्री,गृहमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. सरकारला जबाबदार धरणे, अन्यायावर आवाज उठवणे आणि तथ्यावर आधारित प्रश्न विचारणे ही त्यांच्या नेतृत्वाची खास शैली होती.दिल्लीच्या सत्ता केंद्रात जात असतानाही त्यांनी मराठवाड्याच्या प्रश्नांकडे कायम लक्ष दिले.

सामाजिक कामातही मुंडे यांचे योगदान उल्लेखनीय आहे.ग्रामीण भागातील मुला–मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, वंचित घटकांच्या हक्कां साठी लढा देणे,समाज कल्याण योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोंहोचवणे हे त्यांचे ध्येयच होते.लोकांमध्ये मिसळून त्यांच्या दु:खसुखात सहभागी होण्याची त्यांची जमिनीशी जोडलेली कार्य शैलीच त्यांना “लोकनेते” बनवणारी ठरली.

आज त्यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम, चर्चासत्रे,रक्तदान शिबिरे आणि विकास उपक्रमांचे उद्घाटन आयोजित करण्यात येत असून गोपीनाथराव मुंडे यांचा धडाडीचा,जनताकेंद्रित आणि प्रामाणिक वारसा पुन्हा एकदा उजळून निघत आहे.भलेही स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब आज आपल्यासोबत नसले,तरी त्यांची विचारधारा,संघर्षाचे बळ आणि जनतेसाठीची निष्ठा आजही महाराष्ट्राच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

लेखन – 

चंद्रकांत पाटील , पांडुरंग कसबे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!