प्रदीप गायकवाड यांचा सत्कार ; माहिती अधिकार चळवळीत केजला मिळाले नवे नेतृत्व

केज/प्रतिनिधी
दि.०७ डिसेंबर रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या केज तालुका अध्यक्षपदी श्री.प्रदीप गायकवाड यांच्या निवडीचा जाहीर सत्कार समारंभ रविवारी शासकीय विश्रामगृह केज येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य व्यक्ती तसेच राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान किसान सेल चे बीड जिल्हाध्यक्ष सी.बी.एस.इनामदार यांनी भूषवले.त्यांनी आपल्या मनोगतातून गायकवाड यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.त्यांनी म्हटले की, माहिती अधिकार हा सामान्य माणसासाठी प्रशासनापर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे.समाज हिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडणे,पारदर्शक प्रशासनाचा ध्यास घेणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनणे हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.
प्रदीप गायकवाड यांची निवड ही केज तालुक्या साठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वातून माहिती अधिकार चळवळ नक्कीच बळकट होईल, असे इनामदार यांनी सांगितले.तसेच त्यांनी शेतकरी,युवक आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर कार्य करण्यासाठी संघटनांना बांधील राहण्याचे आवाहनही केले.प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाची रूपरेखा सूत्रसंचालक श्री.पांडुरंग कसबे यांनी उलगडली.यावेळी नुकत्याच झालेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन व्यक्त करून उपस्थितांना सामाजिक बांधिलकीची आठवण करून दिली.
या नंतर आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेले युवक नेते अशोकजी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी नव्याने निवड झालेल्या श्री.प्रदीप गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष श्री.चंद्रकांत पाटील यांनीही आपले विचार मांडत माहिती अधिकाराच्या माध्यमातून लोकशाही बळकट होत असल्याचे सांगितले.
डॉ.अजय कदम यांनी मनोगत व्यक्त करताना माहिती अधिकाराचा सदुपयोग करून प्रशासनात पारदर्शकता आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनकेले. सामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी माहिती अधिकार ही एक प्रभावी साधन आहे,अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार अनिल वैरागे यांनी केले.या प्रसंगी सतीश बनसोडे, सतीश खळगे,नंदकुमार मिसाळ,संजय लोंढे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते,आंबेडकरी चळवळीतील मान्यवर, माहिती अधिकार क्षेत्रातील प्रतिनिधी, व्यापारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये समाजहिताचे अनेक मुद्दे साधक-बाधक चर्चेतून समोर आले.सत्कार कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थितांनी केज नगरपंचायतच्या अध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांचे चिरंजीव श्री.विवेक बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.त्यानंतर स्थानिक समस्यांबाबत व सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा झाली.मैत्रीपूर्ण वातावरणात या भेटीचा समारोप करण्यात आला.
गायकवाड यांच्या निवडी निमित्त झालेला हा सत्कार कार्यक्रम आणि त्यानंतरचा वाढदिवस समारंभ या दोन्ही कार्यक्रमांनी केज तालुक्यात सामाजिक ऐक्य आणि पारदर्शक प्रशासनाच्या बांधिलकी चा संदेश दिला आहे.



