बोरगाव(बु) येथे अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर ; विकास शिंदे यांचे 14 ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा

केज/प्रतिनिधी
मौज बोरगाव(बु) ता.केज जि.बीड येथील शेतकरी विकास नवनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या शेती व पिकाच्या प्रचंड नुकसानीबाबत शासना कडे तात्काळ मदतीची मागणी केली असून, मागण्या न मानल्यास मंगळवार दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी हनुमान मंदिर, बोरगाव (बु) येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.शिंदे यांनी तहसिलदार केज यांच्या कडे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यंदाच्या अतिवृष्टी व मांजरा नदीच्या पुरामुळे त्यांच्या तसेच गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.नदीकाठची जमीन मातीसह खरडून गेल्याने रब्बी हंगामाची पेरणी करणेही अशक्य झाले आहे.
शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या पुढील प्रमाणे आहेत.अतिवृष्टी व महापुरामुळे खरडून गेलेल्या शेती जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.बाधित शेतकऱ्यांचे पिककर्ज माफ करण्यात यावे. विहिरी,सोलार पंप,तुषार सिंचन संच यांच्या नुकसानीचे पंचनामेकरून मदत द्यावी.थकबाकीमुळे होल्ड केलेली बँक खाती महाराष्ट्र ग्रामीण बँक चिंचोली माळी तात्काळ रिलीज करावीत.घरकुल व मनरेगा मजुरांचे हप्ते तात्काळ वितरित करण्यात यावेत तसेच पैशाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.
या निवेदनाची प्रत उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड जिल्हा अजितदादा पवार, आमदार नमिताताई मुंदडा व जिल्हाधिकारी बीड यांना पाठविण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यास बोरगाव (बु) येथील शेतकरी वर्ग एकत्र येऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.



