मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची ई- केवायसी करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – श्री.बाजीराव ढाकणे

बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील हजारो लाडक्या बहिणीची ई -केवायसी करणे बाकी होते या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे.पण या योजनेबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई – केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना राज्य सरकारच्या वतीने यापूर्वी देण्यात आल्या होत्या.
या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा करत या योजनेची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी महाएनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी केले होती.कारण महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांत आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ’योजनेतील अनेक पात्र भगिनींना इ – केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची कल्पना संबंधितांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी तातडीने उचित ठरेल अशी कारवाई करत मुदतवाढ दिली आहे.
या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.याबद्दल महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचीच ई- केवायसी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा.न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कडे जमा करावे.असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे.ज्या भगिनींनी अद्याप इ – केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही,त्यांना विनंती आहे की,त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहन लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी केले आहे.



