देहदान चळवळीचा शुभारंभ आपल्या पासूनच घरापासून संध्याताई बारगजे,दत्ता बारगजे यांचा स्तुत्य उपक्रम

केज/प्रतिनिधी
नाशिवंत देह,जाणार सकळ पण मरणोत्तरही समाजाच्या उपयोगी यावा या उदात्त आणि मानवता वादी विचारातून इन्फंट इंडियाचे संचालक सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे व त्यांच्या पत्नी सौ.संध्याताई बारगजे यांनी देहदान चळवळीचा प्रेरणादायी शुभारंभ आपल्या घरापासूनच केल्याचे समाजात कौतुकास्पद उदाहरण घडले आहे.
संध्याताई बारगजे यांचे वडील व दत्ता बारगजे यांचे सासरे श्री.गणपतराव यशवंता चाटे रा.तांबवा ता.केज यांची प्रकृती चिंताजनक असतानाच,कुटुंबीय व नातेवाईकांच्या समुपदेशनातून सर्वांच्या संमतीने देहदानाचा निर्णय घेण्यात आला.हा निर्णय केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित न राहता समाजाला दिशा देणारा ठरला आहे.
श्री.गणपतराव चाटे हे आनंदग्राम येथील गो शाळेत तब्बल १५ वर्षे गायींच्या सेवेत कार्यरत होते.गोसेवा,साधेपणा, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठा हेच त्यांच्या जीवनाचे मूलमंत्र होते. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी आयुष्यभर सेवा केली.काही महिन्यांपूर्वी हायवेवरून रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जवळपास चार महिने ते खाटेवर होते.
विशेष म्हणजे त्यांना मधुमेह (शुगर) किंवा रक्तदाब (बीपी) असा कोणताही आजार नव्हता.मात्र नियतीपुढे अखेर मान झुकवावी लागली.जिवंतपणी समाजासाठी सेवा केली, तर मरणोत्तरही समाजाच्या उपयोगी पडावे या भावनेतून देहदानाचा संकल्प करण्यात आला.या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे देहदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.सदर देह एचआयव्ही बाधित नसल्याने वैद्यकीयशिक्षण व संशोधनासाठी देहदान करण्यात आले आहे.
श्री.गणपतराव चाटे यांची प्राणज्योत मालवताच आनंदग्राम येथेच अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर नियमानुसार देह वैद्यकीय महाविद्यालय,अंबाजोगाई यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.या प्रसंगी उपस्थितांनी या निर्णयाला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.देहदान ही केवळ वैद्यकीयशिक्षणाची गरज नसून ती विज्ञान, मानवता आणि समाज प्रबोधनाची चळवळ आहे.
या चळवळीच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अमूल्य योगदान मिळते, तर समाजात मरणोत्तर जीवनालाही अर्थ प्राप्त होतो.ही देहदान चळवळ अधिक व्यापक आणि गतिमान व्हावी,यासाठी पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,युवक-युवती व समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुढाकार घ्यावा,असे नम्र आवाहन दत्ता बारगजे व सौ.संध्याताई बारगजे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
देहदानाच्या माध्यमातून समाजाला विज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि मानवतेची नवी दिशा देणारा हा निर्णय अनेक कुटुंबांसाठी आणि समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.



