मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडमध्ये धावणार रेल्वे

बीड / प्रतिनिधी
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर दाखल होणार असून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बीडकरांचे अनेक दशकांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस महापारेषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दशपुते, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए, रेल्वे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गावरील प्रलंबित भूसंपादनाची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारच्या हिस्स्यातील १५० कोटी रुपये तत्काळ अदा करावेत तसेच उर्वरित १५० कोटींची तरतूद करावी, असेही त्यांनी सांगितले. रेल्वेने दिलेल्या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्राची कार्यवाही करण्यावरही त्यांनी भर दिला.
असा आहे बीड–अहिल्यानगर–परळी रेल्वे मार्ग
एकूण लांबी : २६१.२५ किमी
भूसंपादन : १८२२.१६८ हेक्टर
रेल्वे खालील पूल : १३०
रेल्वे वरील पूल : ६५
मोठे पूल : ६५
छोटे पूल : ३०२
प्रकल्प किंमत : ४८०५.१७ कोटी
हिस्सा : केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५०% (२४०२.५९ कोटी) या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार असून या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.



