
केज/प्रतिनिधी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.या घटनेला कारणीभूत असणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची जोरदार मागणी होत आहे.महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या लीगल सेलचे राज्याध्यक्ष डॉ.दत्ता तपसे यांनी सांगितले की,दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही,तर राज्यातील सर्व डॉक्टर संपावर जाण्यास भाग पडतील.
त्यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून,येत्या शनिवार पासून अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.दरम्यान,डॉक्टर संघटनांनी भारतीय दंड संहितेतील कलम ३५३ सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला किंवा अडथळा निर्माण करणे, हे कलम सध्या कमकुवतअसल्याचे सांगत ते अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे.सरकारी सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्या साठी या कलमात कठोर तरतुदी कराव्यात,अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
डॉक्टर संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,जर या प्रकरणातीलआरोपींना तातडीने शिक्षा झाली नाही किंवा शासनाने ठोस नियमावली लागू केली नाही,तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या घटनेविषयी वैद्यकीय समुदायात तीव्र नाराजी व्यक्त होत असून,डॉक्टर हे समाजाचे सेवक आहेत त्यांच्यावर होणारे अन्याय थांबले पाहिजेत,असा एकमुखी स्वर राज्यभरा तून उमटत आहे.



