गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र वैधानिक महामंडळ स्थापन करा,बीडचे खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र हे गड-किल्ल्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अदम्य पराक्रमाचे, मराठा साम्राज्याच्या वैभवाचे आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे हे गड-किल्ले जिवंत प्रतीक आहेत.तथापि,आज या अनेक ऐतिहासिक दुर्गाची स्थिती अतिशय दयनीय असून, दुर्लक्ष ,हवामाना तील बदल,अनियंत्रित पर्यटन आणि देखभाल अभावी त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे राज्यातील ऐतिहासिक व पौराणिक गड-किल्ल्यांचे संरक्षण, संवर्धन व पुनर्वभवासाठी स्वतंत्र वैधानिक महामंडळ स्थापन करावे अशा मागणीचे पत्र बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, राज्याच्या विविध विभागांद्वारे गड- किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धनाची कामे सध्या होत असली,तरी ती तुकड्या-तुकड्यांनी आणि मर्यादित अधिकार व निधीच्या अभावामुळे प्रभावी ठरत नाहीत.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाराष्ट्र गड -किल्ले संवर्धन व विकास महामंडळ या नावाने वैधानिक अधिकार असलेले स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे अत्यावश्यक ठरते.
या महामंडळाला राज्यातील सर्व ऐतिहासिक व पौराणिक गड-किल्ल्यांचे सर्वेक्षण, वर्गीकरण व संवर्धन आराखडा तयार करणे, प्रत्येक गडासाठी ऐतिहासिक व वास्तु शास्त्रीय दृष्ट्या योग्य अशा पुनर्वैभव आराखड्याची अंमलबजावणी,गडांच्या परिसरातील भूमी, बांधकामे, प्रवेशमार्ग, पाणीपुरवठा,स्वच्छता व सुरक्षा या सुविधा विकसित करणे,स्थानिक स्वयंसेवी संस्था,इतिहास अभ्यासक,पर्यटन व सांस्कृतिक विभाग यांच्यात समन्वय साधून दीर्घकालीन जतन योजना राबविणे,वार्षिक अर्थसंकल्पात या महामंडळासाठी स्वतंत्र निधी तरतूद करणे इत्यादी जबाबदारी व अधिकार देण्यात यावेत.
राज्याच्या अस्मितेचा आणि पर्यटन विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या या गड-किल्ल्यांना पुन्हा पूर्ववैभव प्राप्त व्हावे,हे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे.ते साकार करण्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना ही काळाची गरज आहे.
गांभीर्याने विचार करून,लवकरात लवकर अशा महामंडळा च्या स्थापनेचा निर्णय घ्यावा,असेही म्हटले आहे. खा.बजरंग सोनवणे हे बीड जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या बाबतीत आवाज उठवित आहेत. काल किल्ले धारुर दौ-यावर असताना त्यांनी धारुर येथील ऐतिहासिक किल्ल्याची पाहणी केली. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यां बाबत सरंक्षण, संवर्धन व पुनर्वैभवासाठी सरकार दरबारी मांडणी करत आहेत.



