सामाजिक उपक्रम मिठाई,किराणा व ब्लॅंकेट वाटपाने दिवाळी साजरी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांची उपक्रमशीलता समाजा साठी आदर्श!

मुंबई/प्रतिनिधी

दिवाळीचा आनंद सर्व सामान्य जनतेप्रमाणे पत्रकार बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी उपक्रम राबवण्यात आला.राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने सर्व पत्रकार बांधवांना मिठाई,किराणा साहित्य तसेच ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फक्त वस्तू वाटपाचा कार्यक्रम नसून, “आपण किती देतो हे महत्त्वाचं नसतं,तर देण्या मागचा हेतू किती निर्मळ आहे हे महत्त्वाचं असतं,” असा संदेश देणारा सामाजिक जाणीवेचा उपक्रम आहे.
डॉ.विश्वासराव आरोटे यांनी यावेळी सांगितले की,दरवर्षी या वस्तूंचे वाटप करण्यासाठी आम्हाला किती परिश्रम घ्यावे लागतात,हे आम्हालाच माहिती आहे. वेळेवर पत्रकार बांधवांना मदत मिळावी म्हणून मी स्वतः दहा टक्क्याने कर्ज काढूनही आर्थिक व वस्तू रूपाने मदत केलेली आहे. मात्र ही सेवा कधीच थांबलेली नाही आणि पुढेही अखंड सुरू राहील.ते पुढे म्हणाले की,आज संपूर्ण हिंदुस्थान दीपावली साजरी करत असताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे पत्रकार बांधव वर्षभर सुखदुःखात वावरत असतात.
गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघटनेतून हा छोटासा पण अर्थपूर्ण उपक्रम सातत्याने राबवला जातो आहे.यंदा राज्यात पुराची आपत्ती आली.बीड,धाराशिव, अहिल्यानगर, जामखेड या पूरग्रस्त भागात आम्ही किराणा,ब्लॅंकेट आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.त्यांनी पुढे सांगितले की,पत्रकार हा कोणत्याही संघटनेपेक्षा प्रथम समाजाचा प्रहरी आहे.
प्रत्येकजण आपल्या दैनिकात, युट्यूबवर किंवा इतर माध्यमात कार्यरत असतो,पण शेवटी आपण सर्व पत्रकार आहोत ही ओळख सर्वांत श्रेष्ठ आहे. आपल्या कार्याचा अभिमान आपल्या परिवारालाही वाटावा, यासाठी हा उपक्रम आम्ही करत आलो आहोत. दिवाळीत पत्रकारांच्या घरातही आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, मुलांच्या चेहऱ्यावर हास्य यावे हाच आमचा उद्देश आहे.
डॉ.विश्वासराव आरोटे यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली की, राज्यभर पूरग्रस्त शेतकऱ्यांना देखील आम्ही मदतीचा हात दिला.आतापर्यंत साडे तीनशे शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये अशी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची आर्थिक मदत आम्ही केली आहे. खरंतर वर्षातील ३६५ दिवसांपैकी २६५ दिवस आमचे पत्रकार संघाचे कार्यकर्ते सामाजिक उपक्रमात गुंतलेले असतात.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विविध विभागीय प्रतिनिधी,जिल्हा व तालुका संपर्कप्रमुख, तसेच अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर सर्व उपस्थित पत्रकार बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा फक्त संघटनाच नाही तर समाजाच्या सेवेसाठी कार्य करणारा परिवार आहे असा संदेश देण्यात आला.
प्रकाशाचा,आनंदाचा आणि सेवा भावनेचा हा दीपोत्सव सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी आणि उत्साह घेऊन येवो अशा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



