सामाजिक

बीड येथील ओबीसी समाजाच्या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे – मेजर राम राऊत

केज/प्रतिनिधी

ओबीसी समाजाचे हक्क, अधिकार व आरक्षण टिकवण्यासाठी एकजुटीची गरज आहे. ओबीसी समाजातील सर्व बांधवांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय अस्तित्वासाठी ठाम भूमिका घ्यावी व आवाज बुलंद करावा, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते मेजर राम राऊत यांनी केले आहे.या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी समाजाच्यावतीने भव्य ओबीसी समाज एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा ऐतिहासिक मेळावा दि.१७ ऑक्टोबर २०२५ रोजी, शुक्रवार, दुपारी ४ वाजता,छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल,बीड शहर येथे पार पडणार आहे.या मेळाव्यास छगन भुजबळ राष्ट्रीय अध्यक्ष महात्मा फुले समता परिषद, ओबीसी समाजाचे हृदय सम्राट यांच्या नेतृत्वाखाली तसेच मा.मंत्री धनंजय मुंडे,प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह  राज्यभरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभणार आहे.केज तालुका व विधानसभा मतदारसंघातील ओबीसी बांधवांनी या मेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन आपल्या एकतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन मेजर राम राऊत यांनी केले.

ओबीसी समाजात ३७४ जातींचा समावेश असून या समाजाचे सामाजिक आणि राजकीय आरक्षण सध्या धोक्यात आले आहे. सरकारने याचे संरक्षण केले पाहिजे,मात्र सध्याची भूमिका ही संदिग्ध आणि चिंताजनक असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले. “फोडा आणि राज्य करा” या नीतीचा अवलंब काही मंडळींकडून केला जात आहे.त्यालाप्रतिकार करण्यासाठी समाजाने एकदिलाने उभे राहणे अत्यावश्यक आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

“आपल्या हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी प्रत्येक ओबीसी बांधवाने या मेळाव्याचे साक्षीदार व्हावे. एकजूट हीच आपली ताकद आहे,हे सरकार व विरोधकांना दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे ठाम वक्तव्य मेजर राऊत यांनी केले.या मेळाव्याच्या निमित्ताने ओबीसी समाजाचे नेते,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन समाजाच्या न्यायहक्का साठी एकत्र लढण्याचा संकल्प करणार आहेत. मेळाव्याची तयारी जोरात सुरू असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!