देशभक्ती ,पूरग्रस्त ,प्रेम, मातृत्व ,भारूड ,गझलांनी वातावरण भारावलं, कोजागिरी निमित्त गेवराईत रोटरी क्लबचे कवि संमेलन उत्साहात संपन्न .

गेवराई/प्रतिनिधी
कवि संमेलन म्हटलं की, प्रेमाचा प्रेमभंगाचा बहार फुलवला जातो परंतु माणुसकी ,संवेदनशीलता, सामाजिक भान राखत देशभक्ती , वात्सल्य,भारूड, प्रबोधन ,पूरग्रस्तांच्या वेदना कवींच्या मुखातून व्यक्त होण्याचा योग रोटरी क्लब ऑफ गेवराई व साहित्यिक यांच्या वतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमेच्या कवि संमेलनाने धमाल उडवून दिली.सोमवार दि ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १ या वेळेत पत्रकार भवनात रोटरी क्लबऑफ गेवराई व शहरातील कवि साहित्यीक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवि संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यीक ॲड. सुभाष निकम हे होते.
मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र बरकसे, सचिव प्रविण जैन, सामाजिक कार्यकर्ते एस. वाय.अन्सारी,रामानंद तपासे ,प्रा.गणेश सूर्यवंशी अक्षय कुलकर्णी , शिक्षक पतसंस्थेच्या संचालिका दक्षा वानखेडे , रोटरीचे क्लब ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन गणेश कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.कवि संमेलन असल्याने कवी, साहित्यीक, कविता प्रेमींनी गर्दी करायला सुरुवात केली होती.दीप प्रज्वलन करून रोटरीचे संस्थापक पॉल हॅरिस यांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालण्यात आली.कवि संमेलनाची सुरुवात गायक शेख खाजा यांच्या पहाडी आवाजात गुरु स्तवन व ‘जहाँ डाल डालपर सोने की चिडिया करती बसेरा,वो भारतदेश है मेरा ‘ या देशभक्तीपर गीताने झाली. कवयित्री सुरेखा रामदासी यांनी स्वागत गीत सादर केले . प्रा.मारोती गायकवाड यांनी भारदस्त आवाजात गेय कवितेतून ‘सुगंधीबाग आहे ती तिला माहित ही नाही.
तिच्या श्वासापरी दखल जाई – जुईतही नाही ‘ या गझलेने रंगत आणली. त्यावर साज चढवला कवि तथा अभिनेते प्रशांत रुईकर यांनी त्यांनी ” या या दीड जीबी ने बरं नाही केलं ग बया,समद्या देशाला येड लागलं ग बया ” आणि शाहीर विलास सोनवणे यांनी “आमचं जगणं मसान,आमचं मरणं मसान ” या ज्वलंत विषयावर गेय कविता सादर केली.योगतज्ज्ञ सिद्धार्थ मुनेश्वर यांनी ” तुम भी इस हिन्दुस्तान में रहते हो,तुम भी इस मुल्क अपना कहने है ” हे राष्ट्र भक्तीपर गीत संगीतमय गायले. गायक तथा कवी विष्णूप्रसाद खेत्रे यांनी “झाली परक्याची सून तोडून ग तू ही नाती , आता कशाला गं घेती सपनात गाठीभेटी ” हे प्रेमभंग व्यक्त करणारी भावनिक कविता गायली.
प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली . “मायबाप म्हटलं की पोटातून खळखळून उठतं , त्यांच्या मायेविना जणू काही चिंध्या पेटल्यागत होरपळून निघतं “या काव्यमय ओळीतून युवा कवी वसंत केदार यांनी मातृत्व व्यक्त केले. “सिर्फ आदमी है जिंदा, इंसान मर गया, एहसास मर गया “ही सद्य स्थितीवर भाष्य करणारी प्रबोधनात्मक गझलशायर सय्यद मुजतबा यांनी पेश केली .३३ कोटी बसलेले हा एकटाच उभा – या सर्वांना मागे टाकून याचा सवतासुभा ही विठ्ठलाची महती व्यक्त करणारी कविता धर्मराज करपे यांनी सादर केली. कवयित्री वैशाली पाटील यांनी पूरग्रस्तांचे अश्रु व्यक्त केले.
नवोदित कवयित्री शांभवी बोर्डे यांनी ” कसे साजरे करावे आम्ही दसरा अनदिवाळी, उभ्या आयुष्याची इथे पेटली आहे होळी ” ही पूरग्रस्तांच्या व्यथांवर प्रकाश टाकणारी कविता पेश करून सभागृहाला गहिवरून टाकले.कवी मुकुंद टाक यांनी आई व सनई चौघडा काव्य रचना सादर केली.गणेश कुलकर्णी यांनी ” माँ ने खत लिखा चाव से पूत्र मेरा न दूध लजाना,चाहे इंच इंच कट जाना ” ही सीमेवर लढणाऱ्या जवानाशी आईचा त्यागमय संवाद कवितेतून सादर केला.वैद्यकीय व्यवसायात राहून जनतेचं दुःख मुलांचे शिक्षण वैद्यकीय भाषेत ” सिस्टरीनबाई पोलिओ गोवर धनुर्वाता बरोबर एक थेंब बुद्ध,एक थेंब महावीर,जमलं तर एक थेंब मुहंमद पैगंबर यांचा द्या माझ्या पोराला ” ही भावनेला हृदयाला स्पर्श करणारी कविता डॉ. पल्लवी पंडित यांनी सादर केली.
” पिचलेल्या माणसाचं दुःख ओले झेलताना,त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपतांना ” या रचनेद्वारे जेष्ठ कविवर्य प्रकाश भुते यांनी पिचलेल्या अनाथांच्या दुःखाच्या व्यथा स्पष्ट केल्या.शीघ्र कवी,शायर एस.वाय.अन्सारी यांनी आपली कविता व ज्वलंत प्रश्नावर शेर सादर करून टाळ्या मिळवल्या.अध्यक्षीय समारोपात जेष्ठ कवी ॲड.सुभाष निकम यांनी ” तू तर खूपच सुंदर आहेस “ही कविता वाचून रसिक प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले.बाल कवयित्री प्रांजल मनोज टाक हिने काव्य सादर करून रसिकांना भुरळ घातली.
याप्रसंगी दक्षा वानखेडे, सुनिता नागरे,वंदना हिरे, सुरेखा रामदासी,अमृता परड श,साक्षी शिंगाडे, अंशना मचे,भिवाजी अडागळे,प्रा.सुरेश पाटील,रामानंद तपासे, ॲड.प्रशांत वाघमारे, प्रियंका कोकाट आदींनी आपापल्या कविता सादर करून रसिक प्रेक्षकांना काव्यमय सागरात डुंबून काढले.ॲड.प्रशांत वाघमारे यांनी आपल्या दिवंगत भगिनी कवयित्री अलका वाघमारे यांचे दोन काव्यसंग्रह उपस्थित रसिकांना भेट दिले.
या कवि संमेलनास रोटरी क्लबचे व्होकेशनल सर्व्हिस चेअरमन राजेंद्र डेंगे , राधाकिसन लड्डा, युवा उपक्रम संचालक मनोज टाक, कॅ.शंकर सूर्यवंशी,बालग्रामचे संचालक संतोष गर्जे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर ,डॉ. तात्यासाहेब मेघारे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक धनंजय सुलाखे, अभय देशपांडे, प्रभाकर घोडके,प्रकाश दावणगिरे, विजयकुमार बोर्डे, सुवर्णमाला बोर्डे ,अनुसया मुनेश्वर ,दीपक पुरी, लक्ष्मण उमाप ,निवेदक अशोक गलांडे ,रेणुका रुईकर ,रेशमा टाक, सानप, गणेश मिटकरी यांच्यासह रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.



