मराठवाड्यातील पूर ग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन,केजकरांकडून पुन्हा मदतकार्याची चळवळ सुरु

केज/प्रतिनिधी
सध्या मराठवाडा परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून शेकडो कुटुंबे विस्थापित झाली आहेत घरगुती साहित्य, अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणा वर तुटवडा जाणवत आहे.या पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक व तरुण मंडळींनी मदत कार्याची हाक दिली आहे.
२०१९ च्या कोकण महापुरावेळी केज तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कोकणातील पूरग्रस्तांना मदत केली होती.त्याच पद्धतीने आता आपल्या घरच्याच केजकरांना, मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी सर्व स्तरां तून प्रतिसाद मिळत आहे.मदत सामग्रीत ब्लँकेट ,चादरी ,अन्नधान्य ,तेल ,बिस्किटे, चूरमुरे, फरसाण,भडंग, शेंगदाणा चटणी,दूध पावडर,वाळलेले खाद्य पदार्थ,औषधे,गृह उपयोगी साहित्य व सॅनिटरी पॅड्स अशा आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.ही मदत गोळा करून पूरग्रस्तांना पोहोंचवण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दानशूर बांधवांना, वरील नमूद वस्तू स्वरूपात मदत देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार मदत करून पूरग्रस्त कुटुंबांच्या संकटात हातभार लावावा,असे आवाहन करण्यात आले आहे.



