
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मुंडेवाडी गावामध्ये अवैद्य देशी दारू विक्री मुळे गावातील अनेक लोकांचा जीव गेला आहे,हा अतिशय गंभीर गुन्हा असून यातील मुख्य आरोपी नवनाथ गहिनीनाथ घोळवे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी भगवान बाबा चौकात दारूच्या बाटल्या फोडून केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,अंबाजोगाई गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक श्री. जगदीश कोरे यांच्या पथकाने मुंडेवाडी ता. केज जि.बीड येथील भगवान बाबा चौकात अवैधरित्या दारू विक्री करणारा नवनाथ गहिनीनाथ घोळवे याच्या दुकानावर धाड टाकून धंद्याच्या ठिकाणावर मुद्देमाला सह दारू पकडून व पंचनामा करून त्यांच्या दप्तरी गुन्हा नोंद केला आहे.परंतु नवनाथ घोळवे यांने त्याच दिवशी दुपार नंतर आजतागायत सतत पुन्हा दारू विक्री करत आहे व ते लोकांना सांगत आहे की माझे पोलीस अधिकारी किंवा कोणीही काही वाकडे करू शकत नाही मी त्यांना त्यांच्या घरी हफ्ते पोहोच करीत आहे.गावामध्ये सदर च्या दारू विक्रीमुळे दारू पिऊन पाच पुरुष मृत्यू पावले आहेत.
एकवीस वर्षाच्या आतल्या पाच महिला विधवा झाल्या आहेत. अनेकांचे संसार देशो धडीला लागले आहेत. यापुढेही गावात दारू विक्री चालू राहिली तर तरुण मुले,पुरुष दारूच्या आहारीजाऊन व्यसनाधीन बनतील व मरतील अशी भीतीदायक परिस्थिती गावांमध्ये निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला तरुण मंडळ यांनी एकत्रित येऊन नवनाथ गहिनीनाथ घोळवे हा गावात अवैध रित्या देशी दारू विक्री करत आहे.त्यांच्यावर कठोरात कठोरकारवाई करून गावातील दारू विक्री बंद करावी असा ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ग्रामस्थांनी निषेध नोंदवला आहे.