लोकनेते माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकर यांच्या स्मृतींचा अजूनही दरवळ…!

केज /प्रतिनिधी
आज माजी आमदार लोकनेते कै.बाबुराव आडसकर साहेबांचा नववा स्मृतीदिन…. नऊ वर्षांनंतरही स्मृतींचा दरवळ कायम असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी अनेकांची घरे फुलवली. तालुक्यातील सर्व सामान्य माणसाच्या हाताला रोजगार तर पदवीधरांना नौकरी दिली.केज तालुका म्हटले की स्व.बाबुरावजी आडसकर व त्यांचा “हाबाडा” हे शब्द आठवतात.केज तालुक्याच्या नकाशा तील एक छोटेसे गांव म्हणजे आडस.या गांवाला संपुर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख माजी आमदार स्व.बाबुराव आडसकर यांनी मिळवुन दिली. 1964 मध्ये केज पंचायत समितीचे सभापती म्हणुन काम करतांना ग्रामीण प्रश्नांची खरी नस त्यांना सापडली होती.1960 च्या दशकात दळण वळणाची सोय नाही. वृतपञाचा बोलबाला नाही.दुरसंचार माध्यमा तुन फोनची सुविधा अपुरीच होती.अशा काळात संपुर्ण केज अंबाजोगाई परिसर साहेबांनी सायकलवरुन पिंजुन काढला हे विशेष होय.खेडोपाडी आडसकरांनी आपला ऋणानुबंध निर्माण केला.
कुठलाही कार्यकर्ता असो त्याला त्याचे प्रश्न विचारुन त्याला सन्मानाने व समाधानाने ते काम करुनच परत पाठवत असत.त्यांच्या या माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे व काम करण्याच्या धडाडीमुळे प्रत्येक गांवात त्यांच्या कामाचा ठसा निर्माण होत असे.त्याचे बोलके उदाहरण म्हणजे 1972 ची केज विधान सभेची निवडणुक होय. केजच्या सर्वसाधारण मतदार संघातुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून आडसकरांना उमेदवारी मिळाली होती.तर त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील प्रसिध्द विचारवंत कै.बापुसाहेब काळदाते यांना उमेदवारी प्रजा समाजवादी पक्षाने दिली.या लढतीकडे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारत देशाचे लक्ष या लढतीकडे होते.अनेक राजकीय विचारवंत व पञकारांचे अंदाज खोटे ठरवत या मध्ये आडसकर साहेबांनी 38416 मते घेवुन समाजवादी नेते काळदाते यांचा पराभव केला होता.अगदी देशाच्या संसदेतही काळदातेंना पाडणारा माणुस कोण आहे हा प्रश्न पडला होता.केज ची ही निवडणुक मराठवाड्याच्या राजकीय इतिहासात महत्वपुर्ण ठरली याचे कारण म्हणजे बाबुराव आडसकर साहेबांवर प्रेम करणारी ग्रामिण जनता होय.त्यांनी दिलेला “हाबाडा”हा शब्द कुठल्याही इलेक्शन मध्ये चर्चिला जातो.हा त्यांच्या बोली भाषेतला शब्द राजकारणात खुपच रुढ झाला.
कडक टोपी,भारदार मिश्या,पांढराशुभ्र सदरा,धोती व या बरोबरच जॕकेट घालुन वाड्यावर बसलेले साहेब …त्यांच्या शेजारी एक टेलीफोन, पान सुपारीचे तबक,व समोर बसलेले पंचक्रोशीतील शेतकरी व शेतमजुर…! प्रश्न ऐकुन त्याच ठिकाणी तहसील,एमइसीबी, पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना फोन करुन प्रश्नांची सोडवणुक करत.चहा घेतल्याशिवाय कोणीही जाणार नाही याची ते काळजी घेत असत. म्हणुनच तर तेजनतेच्या मनात घर करुन राहिले होते.अनेकांची घर संसारे त्यांनी अंबाजोगाई सहकारी कारखान्याच्या माध्यमा तुन फुलविली होती. 1953मध्ये श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस या शिक्षण संस्थेची स्थापना ही एक शैक्षणिक नांदी ठरली.बालाघाटातील डोंगर रांगेतील देवळा , चोंडी,आसरडोह,साळेगांव,चंदन सावरगाव, कळमअंबा,आडस, आसरडोह या सारख्या खेड्यातही माध्यमिक शिक्षण पोहचविले.भुमी पुञांना न्याय देण्याचे काम केले.केज तालुक्यात प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. बालाघाटाच्या डोंगर रांगातील चोंढी ते देवळा व धारुर,केज व अंबाजोगाई तालुक्या तील अनेक गावांत माध्यमिक विद्यालये सुरु केली.उच्च शिक्षणासाठी ही ते आग्रही असल्यामुळे 1990 ला वसंत वरिष्ठ महाविद्यालय (सध्याचे बाबुरावजी आडसकर वरिष्ठ महाविद्यालय ) केज व छत्रपतीशिवाजी वरिष्ठ महाविद्यालय आडस हे शैक्षणिक संकुल निर्माण केले. वसंत कनिष्ठ व छ. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातुनही अनेक विद्यार्थी वैद्यकीय व अभियांञिकी शिक्षणासाठी प्राप्त झाले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मा.रमेशराव आडसकर यांनी केज,धारुर व कळंब येथे सीबीएसई चे शारदा इंग्लीश स्कुल व वसंत पाॕलिटेक्निक व वसंत फार्मसीकॉलेजची सुरूवात केली.
दि.12 आॕगस्ट 2016 ला काळाने घाला घातला.हा दिवस मराठवाड्याच्या राजकीय व शैक्षणिक क्षेञासाठी दुःखाची वेदना घेवुन आला. केज,अंबाजोगाई व धारुर तालुक्याच्या राजकारणात ग्रामिण भागातील शेतकरी व शेतमजुर यांचे प्रश्न घेवुन लढणारे माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे दुःखद निधन झाले.
बंधु अॕड.मेघराज आडसकर व तात्यांच्या निधनानंतर एकाकी रमेशराव आडसकर खचले नाहीत.कौटुंबिक धक्क्यानंतर ही ते सावरले.तात्यांच्या या कर्मयोगी आयुष्यामुळे अनेकांच्या आयुष्याचे नंदनवन झाले आहे हे विसरता येणार नाही. माणुस माणसांपासुन दुर जात असतांना त्यांनी जोडलेली गर्दी आज ही लोकांच्या स्मरणात आहे..! त्यांचा सर्व सामान्य माणसांचा दरबार आजही जनतेच्या मनात कायम घर करुन आहे.
तात्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.काव्यात संपुर्ण जीवन पट मांडायचा झाल्यास असे म्हणता येईल…
लोकांच्या कामांसाठी ,आमदारकीचे शस्त्र होते
फोनच्या एका रिंगने , बाहेर अस्त्र निघत होते.
इस्त्रायलच्या शेतीचे तंत्रज्ञान तुम्ही पाहिले होते
शेतकऱ्यांच्या विकासासाठी अंबा साखर वाहिले होते
शेवटी नियतीनेच सुखापेक्षा दुःखच जास्त वाढले
शेतकऱ्यांच्या बांधावर आठवणींचे पक्षी धाडले..!
शब्दांकन – प्रा.डाॕ.बाबासाहेब हिरवे



