राखी पौर्णिमेनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भारतीय जवान व पोलीस बांधवांसोबत भावबंधाचा उत्सव संपन्न,खा.बजरंग सोनवणे यांच्या संकल्पनेतून शितलताई लांडगे यांनी बांधली राखी

नवी दिल्ली/प्रतिनिधी
भावंडांच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या वचनाचा प्रतीक असलेला ‘रक्षाबंधन’ सण,यंदा नवी दिल्ली तील महाराष्ट्र सदनात एक वेगळ्याच भावनिक वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्रातील सुपुत्र भारतीय सैन्य आणि पोलीस दलात सेवेत असताना देशसेवेचे आपले कर्तव्य पार पाडत आहेत.मात्र,या कर्तव्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबापासून, विशेषतः बहिणींपासून, दूर रहावे लागते.
या दूराव्याला आपुलकी चा स्पर्श देण्यासाठी राखी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र सदनात भावनिक सोहळा पार पडला.खा.बजरंग सोनवणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या केज महिला तालुकाध्यक्ष तथा येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख सौ.शितलताई लांडगे व महाराष्ट्रीय बहिणींनी उपस्थित जवान व पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधत त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व दीर्घायुष्याची प्रार्थना केली.यावेळी सौ.शितलताई लांडगे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील सुपुत्रांना राखी बांधण्याचे भाग्य मला लाभले,हा दिवस माझ्यासाठी अतुलनीय, पूजनीय आणि अविस्मरणीय आहे.”

या कार्यक्रमाच्या दरम्यान महाराष्ट्र सदनातील अधिकारी वर्ग,भारतीय जवान, पोलीस बांधव तसेच यूपीएससी क्लासेसच्या विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली.राखी बांधल्या नंतर मिठाईचे वाटप करून आणि आपुलकीचे संवाद साधत हा सोहळा अधिकच संस्मरणीय बनला.या अनोख्या रक्षाबंधन उत्सवाने केवळ भावंडांच्या नात्याचा सन्मान केला नाही,तर देशरक्षणा साठी सतत सज्ज असलेल्या जवान व पोलीस बांधवांप्रती कृतज्ञतेची भावना अधिक दृढ केली. उपस्थितांच्या मनात आजचा दिवस कायमचा कोरला गेला.
या कार्यक्रमाच्या वेळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित सैनिकांनी खा.बजरंग सोनवणे आणि बहिणींचे आभार व्यक्त केले आहे.



