आर्य वैश्य समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे देखील आपले ध्येय म्हणून बघावे – गादेवार
केज येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व अमृत महोत्सव संपन्न

केज/प्रतिनिधी
आर्य वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ओढा इंजिनिअरिंग, डॉक्टर व सी ए याकडे आहे ही चांगली बाब आहे पण आता या पलीकडे जाऊन आता स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून मोठ्या पदांवर कार्य करण्याची महत्वाकांक्षा देखील बाळगावी लागेल ती काळाची गरज आहे असे स्पष्ट मत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी व्यक्त केले ते बीड जिल्हा महासभेच्या वतीने केज येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींच्या अमृत महोत्सव सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
केज येथील श्रीराम मंगल कार्यालयात रविवार दि.27 जुलै रोजी आयोजित या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून नंदकुमार गादेवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद बिडवई,प्रदीप मनाठकर,सदानंद मेडेवार हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.सतीष साळुंके व अमृत चे मराठवाडा व्यवस्थापक सुशांत देशपांडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना गादेवार म्हणाले कि,पारंपारिक उद्योगांना थोडेसे बाजूला करत मागील काही वर्षात आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर,सी. ए,इंजिनिअर,आय टी क्षेत्रात आपले करिअर निवडले आता या सोबतच आणखी नवीन दिशांची निवड देखील करावी लागणार आहे. यात आता विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष केंद्रित करत शासनाच्या मोठ्या पदांवर देखील विराजमान होणे गरज असल्याचे सांगितले तसेच समाजातील पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या व्यक्तींचा अमृत महोत्सव सार्वजनिक मंचावर साजरा होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून त्यांचा सत्कार करता येण्याचे भाग्यआपणास मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या आई वडिलांचा उतारवयात सांभाळ करणे ही आपली सनातनसंस्कृती आहे त्यामुळे त्यांना कोणीही एकटे अथवा वृद्धाश्रमात सोडू नये अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली समस्त समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र तिरुपती येथे पंचेवीस कोटी रुपये खर्च किंमतीच्या होऊ घातलेल्या निवासी संकुलाची ईमारत देखील दीड वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही देत यासाठी समाज बांधवांनी योगदान द्यावे असे आवाहनही या प्रसंगी केले.
समाजात सहिष्णुतेची, ममतेची व माणुसकीची पेरणी आपल्या प्रत्येकाच्या घरात असलेली जेष्ठ मंडळी करत असतात.भावी पिढीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असतो ते चालते बोलते संस्कार पीठ असतात. त्यामुळे जेष्ठांना जपा कारण आता पूर्वीप्रमाणे शाळांमधून संस्कार हा विषय ईतिहास जमा झाला आहे असे डॉ. सतीष साळुंके यांनी सांगत सार्वजनिक मंचावरून जेष्ठांचा अमृत महोत्सव घेण्याच्या संकल्पनेचे तोंडभरून कौतुकही केले.शासनाच्या वतीने वर्षभरापूर्वी चालु करण्यात आलेल्या अमृत योजनेच्या माध्यमातून उद्योगा पासून ते विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्या साठी असलेल्या विविध योजनांची माहिती व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती अमृतचे मराठवाडा व्यवस्थापक सागर देशपांडे यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सूर्यकांत महाजन यांनी करत जिल्हा महासभे च्या एकूणच कार्याचा व या कार्यक्रम घेण्या मागची भूमिका यावेळी विषद केली.
===============
दिव्यांग वैभवचा केला विशेष सत्कार
अपघातात आपलेदोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार या धारूर येथील युवकानेआपल्या अपंगत्वावर मात करत एमपीएससी स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल त्याचा विशेष असा सत्कार यावेळी करण्यात आला
===============
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमासाठी जिल्हा भरातून तीनशे ते चारशे समाजबांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद बिडवई यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव अजय रुद्रवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रोजेक्ट चेअरमन सुहास चिद्रवार,वैभव झरकर,बालाजी बासटवार,गणेश डुबे, प्रकाश कामाजी,अमित कामाजी यांच्यासह केज येथील समाज बांधवांनी विशेषपरिश्रम घेतले.



