केज शहरात शिवजयंतीचा जल्लोष ; ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध मिरवणुकीने शिवरायांना मानवंदना!

केज/प्रतिनिधी
सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांत घुमणारा जय भवानी,जय शिवाजी चा जयघोष आज केज शहराच्याकानाकोपऱ्यात घुमला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केज शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. पारंपारिक वाद्ये,लेझीम पथके आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण केज शहर शिवमय झाले होते.
ठळक वैशिष्ट्ये:
डीजेला फाटा,संस्कृतीला मान:
यंदाच्या मिरवणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिवप्रेमींनी डॉल्बीच्या कर्कश आवाजाला फाटा देऊन स्वतःहून बंदी घातली होती.त्याऐवजी ढोल -ताशा आणि वासुदेव पथकांच्या गजराने शहरात एक वेगळेच नवचैतन्य पसरले होते.
रणरागिणींचा सहभाग: डोक्यावर भगवे फेटे बांधून महिलांनी मोठ्या संख्येने फेरीत सहभाग घेतला.महिलांच्या या शिस्तबद्ध सहभागाने मिरवणुकीची शोभा वाढवली.
रोषणाईचा झगमगाट:
केज शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक विविध रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघाला होता. हा परिसर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
शिस्तबद्ध नियोजन आणि पोलीस बंदोबस्त
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी शिवप्रेमीं कडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि फराळाचे वाटप करण्यात आले.अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत ही मिरवणूक पार पडली.अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली केज पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.विविध सार्वजनिक मंडळांनी सादर केलेले जिवंत देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदाच्या शिवजयंती उत्सवात एक वेगळीच रंगत भरली.



