गुटखा माफियांची गय नाही ;उत्पादकांवर आता ‘मकोका’ लागणार, तुकाराम मुंढेंचा भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही सज्जड दम

मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील अवैध गुटखा आणि पानमसाला विक्री च्या संघटित जाळ्याला मुळासकट उपटून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन,साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारी नेटवर्कविरुद्ध थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली.तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या सोळा दिवसांत राज्यभरात धाडी टाकून ३ कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ३५० जणांना अटक केली आहे.
हा अवैध व्यवसाय म्हणजे एक संघटित गुन्हेगारी असून यात सहभागी असलेल्या उत्पादकापासून ते किरकोळ विक्रेत्यापर्यंत कोणालाही सोडले जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बेकायदेशीर व्यवसायात एफडीएचे काही अधिकारीही सामील असल्याचे आरोप होत असून,मुंढे यांनी या अंतर्गत चौकशी चे आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर थेट बडतर्फीची आणि कायदेशीर कारवाई केली जाईल,असा कडक इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या माफियां ची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.



