प्रशासकीयसामाजिक

बीड जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांचा केज तालुका दौरा ; विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाचा घेतला ऑन द स्पॉट आढावा

केज/प्रतिनिधी

बीड जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी नुकताच केज तालुक्याचा झंझावाती दौरा करून विविध शासकीय कार्यालये, औद्योगिक आस्थापना आणि केंद्र शासन पुरस्कृत विकास योजनांच्या अंमल बजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली.प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आणि विकासकामांना गती देणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.

औद्योगिक क्षेत्राची पाहणी 

कुंबेफळ येथील जीनिंग मिलला भेट देऊन दौऱ्याची सुरुवात कुंबेफळ ता.केज येथून झाली.जिल्हाधिकाऱ्यांनी येथील व्यंकटेश्वरा जीनिंग मिलला भेट देऊन कापूस प्रक्रिया, शेतकऱ्यांशी संबंधित बाबी आणि कामगार व्यवस्थापनाची माहिती घेतली.कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात समन्वय साधून स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत त्यांनी संबंधितांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

महसूल विभागाची कानउघडणी 

‘ई-ऑफिस’वर भर देण्याचे निर्देश

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसील कार्यालयात सर्व मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.सामान्यांची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजेत असे ठणकावून सांगत त्यांनी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करण्याचे आदेश दिले. महसूल प्रकरणांचा निपटारा गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

अमृत २.० अभियान:

 

केज शहराच्या कायापालटासाठी सक्त सूचना

नगरपंचायत केज येथे केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियाना अंतर्गत सुरू असलेल्या हरित क्षेत्र विकास व तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.कामाचा दर्जा आणि निधीचा विनियोग यावर चर्चा करतानाच,ठरवून दिलेल्या कालमर्यादेत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले.

राजीव गांधी तलावाची प्रत्यक्ष पाहणी

शहरातील राजीव गांधी तलाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पाची पाहणी केली. तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवणे आणि पर्यावरण संवर्धन करणे यावर त्यांनी भर दिला. “नागरिकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक सुविधा निर्माण करताना कामात कसलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दौऱ्याचे फलित

जिल्हाधिकाऱ्यांच्या या सखोल दौऱ्यामुळे केज तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होऊन शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटका पर्यंत पोहोचण्यासाठी हा दौरा मैलाचा दगद ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!