स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे – डॉ. अदिती सारडा डॉ. आदिती सारडा फिनिक्स महिला प्रेरणा पुरस्काराच्या योग्य मानकरी – पत्रकार संतोष मानूरकर


बीड /प्रतिनिधी
आदित्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये डॉ. आदिती सुभाष सारडा यांचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. बीड जिल्ह्याचे सर्वांगीण वैभव वाढवण्यामध्ये सारडा परिवाराचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याने आज जागतिक महिला दिनी डॉ. आदिती सारडा यांना पत्रकार संघाच्या वतीने दिलेला फिनिक्स महिला प्रेरणा पुरस्कार योग्य आणि कौतुकास्पद आहे असे स्पष्टमत ज्येष्ठ पत्रकार संतोष मानूरकर यांनी व्यक्त केले. तर स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे.
तिचा सन्मान आणि समानता हीच खऱ्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. जर महिलांच्या हातात सत्ता म्हणजेच प्रशासन असेल तर सुशासन निर्माण होते, एक चांगली शिस्त लागते हे मी आदित्य ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे करू शकले. असा विश्वास सत्कारमूर्ती डॉक्टर आदिती सारडा यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.
जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दिनांक 8 मार्च रोजी बीड येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि दैनिक समर्थ राजयोगच्या वतीने सामाजिक जाणीव ठेवणाऱ्या उपक्रमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. बेघर निवारा केंद्रातील पुनर्वसित झालेल्या 6 महिलांना प्रमुख अतिथी डॉ. आदिती सुभाषचंद्र सारडा यांच्या शुभहस्ते साडीचोळी, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा सन्मानाचा फिनिक्स महिला प्रेरणा पुरस्कार 2026 हा डॉ. आदिती सुभाषचंद्र सारडा यांना ज्येष्ठ पत्रकार संतोष मानूरकर आणि कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार वैभव विवेक स्वामी, पत्रकार शेख आयेशा, सामाजिक कार्यकर्त्या सौ मनिषा स्वामी, काळजीवाहक छाया सरोदे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन शानदार गुणगौरव करण्यात आला.
यावेळी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील प्रत्येक लाभार्थ्यांच्या व्यथा ऐकून संवेदनशील झालेल्या सत्कारमूर्ती डॉ. आदिती सारडा यांनी भावनिक होऊन आपले अनमोल असे विस्तृत मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या की,आज मला या ठिकाणी सत्काराच्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली.
माझ्या डोळ्याने येथील व्यथा बघितल्यावर माझी समाजाकडे बघण्याची दृष्टी खऱ्या अर्थाने बदलली आहे.आम्ही जे काही काम विद्यार्थ्यांसाठी करतो त्यावेळी आमचे व्यक्तिगत काम आम्हाला बाजूला ठेवावे लागते आणि प्राधान्य विद्यार्थ्यांना द्यावे लागते. त्यामुळे आम्ही खूप त्याग करतो असे कधी कधी वाटत होते. पण आमच्या पेक्षाही जास्त त्याग येथे काम करणाऱ्या आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या अनेकांचा आहे.
त्यामुळे आज माझा सत्कार एका चांगल्या समूहामध्ये झाला. आणि या कार्यक्रमामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण झाला यातच या उपक्रमाचे यश आहे. असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या, पत्रकार वैभव स्वामी यांनी आज पुनर्वसित झालेल्या महिलांना माझ्या शुभहस्ते सन्मानित करून खऱ्या अर्थाने सामाजिकतेची जाणीव करून दिली आहे. आजचा हा सोहळा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे,अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिव्हाळा बेघर केंद्राचे संचालक राजू वैद्य यांनी सविस्तरपणे केले.तर सत्कारमूर्तींच्या व्यथा आणि बेघर निवारा केंद्राची यशस्वी गाथा मुख्य व्यवस्थापक राजू वंजारे यांनी विस्तृतपणे अंगावर शहारे आणणाऱ्या शब्दांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास पत्रकार, प्रतिष्ठित, शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची गोड सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पत्रकार वैभव स्वामी यांनी पुढाकार घेतला.
डॉ.आदिती सारडा फिनिक्स महिला प्रेरणा पुरस्काराच्या ठरल्या मानकरी..!
शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि दैनिक समर्थ राजयोग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आदिती सारडा यांना यावर्षीचा फिनिक्स महिला प्रेरणा पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. बीड शहरात आरोग्य व कृषी क्षेत्रातील शैक्षणिक दालने उपलब्ध करून देत आदित्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
पुनर्वसित महिलांचा गुणगौरव…!
घरातून बेघर झाल्यानंतर ज्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्राने आश्रय दिला. त्या केंद्रात नव्याने जगण्याची ऊर्जा घेऊन ज्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहून बेघर केंद्रातून बाहेर पडल्या आणि पुनर्वसित होऊन समाजामध्ये स्वाभिमानाने जगू लागल्या आहेत. यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आशाबाई शिवाजी आव्हाड, रईसा महमूद पठाण, संगीता राजेंद्रसिंग जव्हेरी, मनीषा वनवे, शेख इसरत शेख मेहमूद, बेबीताई गणपत शेंडगे या महिलांना नवीन साडीचोळी, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.



