सामाजिक

अंबाजोगाईत निवासी डॉक्टरची आत्महत्या ; ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालया (स्वाराती) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुण निवासी डॉक्टरने रोहिदास कॉलनी येथे रूम करून राहत असलेल्या घरांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून,सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,डॉ.मंदार दाभाडे असे मृत डॉक्टरचे नाव असून,ते ‘स्वाराती’ रुग्णालयात पदव्युत्तर (PG) शिक्षण घेत होते. अत्यंत होतकरू,अभ्यासू आणि रुग्णसेवेसाठी समर्पित म्हणून त्यांची ओळख होती.उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते.मात्र,त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले ? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

ही घटना समोर येताच वैद्यकीय महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली.सहकारी डॉक्टर,विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने तीव्र दुःख व्यक्त केले.ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थेतील डॉक्टरचा अशा प्रकारे अंत होणे अत्यंत चिंताजनक मानले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसा कडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान,या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील ताणतणाव, कामाचा वाढता दबाव आणि मानसिक आरोग्य या विषयांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.निवासी डॉक्टरांवर असलेला कामाचा ताण, दीर्घ ड्युटी तास आणि भावनिक दबाव यांचा सखोल विचार करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.ही घटना केवळ एकाकुटुंबासाठीच नव्हे,तर संपूर्ण समाजा साठी मोठी हानी असून, एका होतकरू आणि सेवाभावी डॉक्टरचा असा अकाली अंत सर्वांनाच चटका लावणारा ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!