माणुसकीचा जिवंत नमुना..! पत्रकार वैभव स्वामीने वाचवले नालीत अडकलेले गायीचे वासरू

बीड प्रतिनिधी
बीड शहरातील डॉक्टर गिरी हॉस्पिटल परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत माणुसकीचा जिवंत नमुना पाहायला मिळाला. नालीत पडलेल्या गाईच्या वासराला वाचवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेत असताना, पत्रकार वैभव स्वामी यांनी धाडस दाखवत त्या वासराचे प्राण वाचवले. त्यांना पेपर वाटप करणाऱ्या कैलास नामक युवकाने नालीत उतरून गाईचे वासरू बाहेर काढण्यासाठी मदत करत मोठ्या हिमतीचे आणि धाडसाचे काम करत वासराचे प्राण वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका गाईचे वासरू चुकून रस्त्यालगत असलेल्या नालीत 20 मार्च 2026 रोजीच्या पहाटे जन्मल्या जन्मल्या पडले होते. नालीच्या शेजारी गाईने नवजात वासराला जन्म दिला. मात्र चुकून वासरू उठून उभा राहण्याचा प्रयत्न करत असताना अंधारात पहाटेच्या वेळी ते नवजात जन्मलेले वासरू पाय घसरून गुडघाभर खोल असलेल्या नालीत पडले.ते बाहेर पडण्यासाठी झगडत असताना अनेक भटकी कुत्री त्याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होती. त्या वेळी गाईनेही आपल्या वासराला वाचवण्यासाठी कुत्र्यांशी झुंज देण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती. मात्र, गाय हल्ला करेल किंवा कुत्रे चावतील या भीतीमुळे कोणीही पुढे जाण्याचे धाडस करत नव्हते. या गंभीर परिस्थितीत पत्रकार वैभव स्वामी यांनी कोणतीही भीती न बाळगता पुढाकार घेतला. त्यांच्या मदतीला पेपर लाईन करत असलेल्या कैलास नामक युवक पुढे आला.
त्याने खाली नालीत उतरून जखमी अवस्थेतील नवजात गाईचे वासरू अलगद बाहेर काढत वैभव स्वामी यांच्या हातात दिले.त्यांनी ते वासरू मोठ्या हिमतीने उचलून अंगावर धावून येणाऱ्या गाईजवळ सोडले.त्यानंतर त्या गाईने वासराला जवळ घेत आपलंसं केलं. पण ते वासरू नालीत पडल्यामुळे जखमी झालेलं होतं .त्याच्या पायातून पाठीतून रक्त निघत होतं. म्हणून त्यावेळी प्रसंगावधान राखून वैभव स्वामींनी तात्काळ डॉक्टरांना बोलावून अर्धा एक तास थांबून त्याच्यावर योग्य ते उपचार करून त्याचे प्राण वाचवले.
वैभव स्वामी यांच्या या धाडसी कृतीमुळे वासराचे प्राण वाचले आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला.या घटनेमुळे “माणुसकी अजून जिवंत आहे” याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, पत्रकार वैभव स्वामी यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.



