नसरापुर प्रकरणी आरोपीला फाशीची मागणी,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने – डॉ.गणेश ढवळे

बीड/प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुर येथे साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबाणेशकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून ३० दिवसांत आरोपपत्र दाखल करावे व पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा,अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अनेक प्रकरणांमध्ये केवळ घोषणा होतात, पण खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात.या प्रकरणात तरी ठोस व तातडीची कारवाई व्हावी अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी,अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.याचवेळी न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार करणा-या पोलिस यंत्रणेचाही निषेध करण्यात आला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्राताई पवार यांना निवेदन पाठविण्यात आले.या आंदोलनात प्राचार्य डी.जी.तांदळे, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे,शेख युनुस,रामनाथ खोड, मुबीन शेख,सय्यद सादेक,रामधन जमाले, डॉ.संजय तांदळे, किष्किंधा पांचाळ, मुस्ताक शेख आदींचा सहभाग होता.
नसरापूर ता.भोर येथील निष्पाप चिमुकलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि त्यानंतर झालेला निर्घृण खून ही घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. या घटनेबद्दल मनात तीव्र संताप वेदना आणि असहायता निर्माण झाली आहे.अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीं मुळे समाजातील मानवतेलाच काळिमा फासला जात आहे.या निर्दयी कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो अशा प्रकारच्या घृणास्पद गुन्ह्यांना कुठल्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा,म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी,हीच संपूर्ण समाजाची मागणी आहे. यामुळेच भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसेल आणि निरपराध मुलींच्या सुरक्षिततेबाबत समाजात ठोस संदेश जाईल.
प्रशासनाने या प्रकरणात कोणतीही ढिलाई न करता जलदगतीने न्याय देण्याची जबाबदारी पार पाडावी.पीडित कुटुंबाला न्याय मिळावा,हीच आमची ठाम भूमिका आहे.— श्री बाजीराव ढाकणे बीड जिल्हा समन्वयक,लेक लाडकी अभियान,महाराष्ट्र राज्य



