हजयात्रा नोंदणी पहिला हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्या – खा. बजरंग सोनवणे

- बीड/प्रतिनिधी
पवित्र हज यात्रा-२०२६ नोंदणी संदर्भातील पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख दि.३० ऑगस्ट पर्यंत वाढवावी, अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय अल्पसंख्यांक मामले विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन केली.
पत्रात म्हटले आहे की, पवित्र हज यात्रेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जात असतात.नोंदणी संदर्भातील पहिला हप्ता भरण्यासाठी दि.२० ऑगस्ट पर्यंतच मुदत देण्यात आलेली आहे.परंतु लॉटरीजाहीर झाल्यानंतर १५ ते १७ ऑगस्ट पर्यंत बँकांच्या सलग सुट्ट्या आणि बॅंकांमधील तांत्रिक अडचणींमुळे हज यात्रेसाठी इच्छुक अनेक यात्रेकरुंना वेळेत रक्कम जमा करता आली नाही.
हज यात्रे साठी जाणाऱ्या नागरिकांची अडचण लक्षात घेणे आवश्यक असून त्यांना हज ला जायचे असताना नोंदणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होवू नयेत,यासाठी दि.३० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देणे आवश्यक आहे.या विषयाकडे गांभिर्याने पाहून मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही खा. बजरंग सोनवणे यांनी केली आहे.यावेळी केंद्रीय अल्पसंख्यक मामले विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी खा.बजरंग सोनवणे यांना या विषयावर वैयक्तिक लक्ष घालून आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.खा.बजरंग सोनवणे सातत्याने सामाजिक विषय मांडत असल्याने त्यांच्या पाठपुराव्याचे आणि विषय मांडणीचे कौतूक होत आहे.



