
केज/प्रतिनिधी
केज कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व सुस्थितीत पार पडली. या सभेस जेष्ठ नेते तथा सर्वसामान्यांचे लढवय्ये संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे रमेशरावजी आडसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. अंकुशराव इंगळे होते. तर उप सभापती डॉ. वासुदेव नेहरकर,जिल्हा भाजपा सचिव सुनील आबा गलांडे,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार,माजी सभापती लक्ष्मीकांत लाड, संचालक अरुण धपाटे, राजेश आगे, पशुपतीनाथ पाटील, तसेच सचिव संतोष देशमुख सर्व व्यापारी व समितीचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अडी अडचणी,बाजारातील सुविधा,नवीन योजना, तरतुदी व आर्थिक अहवाल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीच्या विकासात्मक योजना, बाजारपेठेतील दर स्थिरता व शेतकरी व्यापारी यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी ठराव करण्यात आले.
सभेत बोलताना जेष्ठ नेते रमेशरावजी आडसकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले तसेच येत्या काळात शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
सभापती अंकुशराव इंगळे यांनी समितीच्या कामकाजाचा आढावा सादर करत शेतकऱ्यां च्या हितासाठी नवीन उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्यप्रणालीस शुभेच्छा दिल्या.सभेचेप्रास्ताविक व सूत्र संचालन सचिव संतोष देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर यांनी मानले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेमुळे शेतकरी,व्यापारी व समिती यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होऊन कृषीविकासाच्या दिशेने नवे पाऊल टाकले गेले असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याअस्मानी संकटातून शेतकरी सावरला जावा यासाठी रमेशराव आडसकर सतत प्रयत्नशील आहेत.संवेदनशील व्यक्तीमत्व असणाऱ्या रमेशराव आडसकर यांनी सत्कार स्वीकारला नाही त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.



