
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयात आयोजित विकसित भारत २०४७ स्वातंत्र्याच्या १०० वर्षा कडे भारताची वाटचाल या विषयावरील एक दिवशीय बहुविद्याशाखीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रो.डॉ.सर्जेराव निमसे माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व लखनौ विद्यापीठ, लखनौ हे बोलत होते.पुढे बोलताना त्यांनी विकसित भारत २०४७ हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी भारताला आधुनिक पायाभूत सुविधा,बेरोजगारी,कृषी क्षेत्र, शिक्षण व्यवस्था, संशोधन व विकास, नवोपक्रम, सामाजिक प्रगती,हवामान बदल या आव्हानावरती मातकरावी लागेल यामध्ये विकसित राष्ट्रांच्या धर्तीवर भारताला अमुलाग्र बदल करावे लागतील तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊनच हे स्वप्न पूर्ण होऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.
या परिषदेसाठी बीजभाषक म्हणून लाभलेले डॉ. जय प्रकाशजी दरगड, माजी प्राचार्य,दयानंद सायन्स कॉलेज, लातूर यांनी विकसित भारत २०४७ या विषयावर पावर पॉइंट प्रेझेंटेशन करून जगातील विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारताची सध्याची परिस्थिती काय आहे याच्या एकूण आकडेवारीसह त्याचे स्पष्टीकरण देऊन त्यांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ची आव्हाने व उपाय योजना यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.हरिदासविधाते सदस्य,सिनेट व अकॅडमी कौन्सिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपतीसंभाजी नगर यांनी विकसितभारत २०४७ हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी देशातील शिक्षण व्यवस्था व सध्या राबवत असलेले एन इ पी – २०२० धोरण अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे यांनी प्रास्ताविकात महा विद्यालयाच्या स्थापने पासून ते आत्तापर्यंतच्या विकासावर प्रकाश टाकून त्यांनी या परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून दिला.या परिषदेच्या दुसऱ्या सत्रासाठी साधन व्यक्ती म्हणून उपस्थित असलेले प्रो.डॉ. महेश जोशी, डिपार्टमेंट ,स्कूल ऑफ एज्युकेशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांनी विकसित भारत २०४७ हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी कृषी क्षेत्र, ग्रामीण विकास, शहरीकरण नवीन तंत्रज्ञान,शिक्षण व्यवस्था या सर्व क्षेत्रात अमुलाग्र बदल आणि विकास होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.या परिषदेच्या तिसऱ्या सत्रात प्रो.डॉ.राजेंद्र धाणे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शासकीय महिला कॉलेज, धारवाड,कर्नाटक यांनी विकसित भारत २०४७ हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी देशातील विविध भाषांचा विकास,शिक्षण व्यवस्थेचा विकास महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनीव्यक्त केले.
याच परिषदेत विविध सत्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्राचार्य डॉ. गौतम पाटील,सदस्य, स्थानिक व्यवस्थापन परिषद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर,प्राचार्य डॉ. अजय पाटील,सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर,प्राचार्य गोरोबा खुरपे कला वाणिज्य महाविद्यालय,मायणी, जि.सातारा,डॉ.वैशाली अहिर,इंग्रजी विभाग प्रमुख,सरस्वती महा विद्यालय,केज यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विकसित भारत २०४७ या विषयावर आपली मते व्यक्त केली.
या परिषदेसाठी देशभरा तून १७३ संशोधन पेपर आले.या संशोधन पेपरचे प्रोसिडिंग तयार करून ते परिषदेच्या समारोपानंतर लगेचच प्राध्यापकांना प्रमाणपत्रासोबत देण्यात आले.या परिषदेसाठी देशभरातील अनेक प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.ही परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे, परिषदेचे संयोजक प्रो.डॉ. नंदकिशोर चिताडे, डॉ.जयंत मोरे,आय.क्यू ए.सी कॉर्डिनेटर प्रो.डॉ. मुरलीधर लहाडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



